- बेळगाव प्रश्नासारखे (जे पूर्वी असायचे काही कारणच नव्हते!) वर्षानुवर्षे भांडणे-मारामाऱ्या-खून-आंदोलने वगैरेंसाठी आयते कारण देणारे नवीन वाद/ प्रश्न निर्माण झाले. आधीच दुहीसाठी कारणांची कमतरता नसलेल्या देशात या आणखी एका कारणाची भर घालण्याची आवश्यकता नव्हती.
- राजकारण्यांची मात्र छान सोय झाली. प्रकाशझोतात रहायला दुसरे काही साधन नसेल, की बेळगावचे कारण काढून चालली अख्खी पुणे महानगरपालिका आपले कामधंदे सोडून बेळगावात आंदोलन करायला! (हा प्रकार घडलेला आहे!) पुण्यात काय प्रश्न कमी आहेत?
- आंतरराज्य ध्रुवीकरण (interstate polarization): पूर्वी सामान्य मराठी भाषिकांस एकंदरीत कन्नडभाषिकांबद्दल (आणि vice versa) द्वेष वाटायचे काहीच कारण नव्हते. (खरे तर अजूनही नाही!) आता असा द्वेष भडकवण्याची राजकारण्यांची सोय झाली.
- अंतर्राज्य ध्रुवीकरण (intrastate polarization): पूर्वी मुंबई प्रांतात, मध्यप्रांतात (विदर्भात, तसेच इंदौर-ग्वालियरमध्येसुद्धा), निज़ामराज्यात (मराठवाड्यात आणि खुद्द हैदराबादेत) वगैरे पसरलेले मराठी जन एकमेकांबद्दल आपुलकीची भावना बाळगून (असे वाटते!) विभिन्न पण सुखाने नांदत असत. आता यांपैकी सलग मराठीभाषिकबहुल भूप्रदेश एकत्र करून महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर 'पुण्याची मराठी बरोबर की मुंबईची की (देव न करो!) नागपूरची' असले फालतू वाद, त्याबरोबर श्रेष्ठकनिष्ठत्वाच्या भावना आणि त्यातून येणाऱ्या मारामाऱ्या, झालेच तर स्वतंत्र विदर्भाची अधूनमधून येणारी मागणी, असले नवीन, अनावश्यक प्रश्न मात्र उगाचच निर्माण झाले.
- अंतर्मुंबई ध्रुवीकरण (intra-Mumbai polarization): मुंबईत पूर्वीपासून सर्व प्रकारचे लोक राहत असताना कोणाला त्याचे काही वाटत नसे. आता "मुंबई महाराष्ट्राची" ("महाराष्ट्राची"पुढचा "च" बहुधा अध्याहृत!), तेव्हा "मुंबईतून मद्राश्यांना/उत्तरप्रदेशीयांना/मुसलमानांना/(गाळलेली जागा भरा) हाकलून द्या" म्हणण्याची फुटीरतावादी राजकारण्यांची सोय झाली.
(हे चांगले आहे! रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले - किंवा नंतर पुणे-सांगली-साताऱ्याहून आलेले - तेवढे 'स्थानिक', बाकीचे मात्र उपरे!
तसेच म्हणायचे झाले तर कोळी, [ऐकीव माहितीनुसार] त्रिलोकेकर-जयकर-विजयकरादि उपनामधारी [अर्थात पाठारे प्रभू] आणि पारशी सोडल्यास खरे तर इतर कोणीच मुंबईचे 'स्थानिक' असू नये. कारण हेच खरे मुंबईचे मूळ रहिवासी [किंवा पारशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर 'मराठी' लोकांच्याही कित्येक शतके अगोदर येऊन मुंबईत वसलेले], बाकी सगळेच उपरे! पण लक्षात कोण घेतो?)
- महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०५ जणांचा (मोरारजीभाईंच्या आवृत्तीनुसार ८० जणांचा*) (मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंच्या आदेशावरून) पोलिसांच्या गोळीबारात हकनाक बळी पडला नसता.
*१९७७ सालच्या निवडणुकांअगोदर दक्षिण महाराष्ट्रात कोठेतरी (नेमके कोठे ते आठवत नाही) जनता पक्षाच्या एका निवडणूकप्रचारसभेत मोरारजीभाई भाषण देत असताना श्रोत्यांपैकी कोणीतरी त्यांना 'त्या' १०५बद्दल प्रश्न विचारलाच! त्यावेळी मोरारजीभाईंनी 'ते १०५ नव्हतेच, ८०च होते, आणि ते गुंड होते' अशा आशयाचे विधान केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी एस.एम.जोशी (संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी!) होते. त्यांनी (प्राप्त / ऐकीव माहितीनुसार) एका अक्षरांनीही या विधानाला विरोध दर्शवला नाही, की निषेध नोंदवला नाही! Politics makes strange bedfellows!