आम्हां बहिणींना आमच्या बाबांनीच रांगोळ्या काढायला शिकवल्या. रांगोळीची अजून एक आठवण म्हणजे माझे बाबा सुंदर रांगोळी काढतात. जेवणाच्या ताटाच्या बाजूंनी महिरप काढतात, त्यामध्ये एका बाजूने महिरप व दुसऱ्या बाजूने आकार महिरपीचाच पण त्यामध्ये मोर, बदक असे असायचे. महिरपीच्या रेषेच्या आतून बोटाने ती रेष रेखीव करायचे. मला ते नीट शब्दात नाही सांगता येणार कशी रेखीव बनवायचे ते. मोर असला तर त्यातील पिसाऱ्यातील नक्षीकाम काडेपेटीने रेखीव बनवायचे. पूर्वी लग्नसमारंभाला पंगती होत. खाली जमीनीवर ताट व पाट अशा. त्यामुळे नातेवाईकांच्या लग्नसमारंभामध्ये बाबा खास पंगतीला (नवरा-नवरी व त्यांचे आईवडील) यांच्या जेवणाच्या ताटाभोवती महिरप घालायचे.