मी जीएंचे फारसे वाचलेले नाही. फक्त एकच पुस्तक -काजळमाया- वाचले आहे. मृदुला म्हणते तसे मलाही वाटत होते की जीएंच्या लिखाणाचा एकसंध असा परिणाम होतो. पण आता तुम्ही भाषासौंदर्याचे असे नमुने वेगळे काढल्यावर मलाही काजळमायातील तसे काही आठवत आहे.
मुख्य म्हणजे काजळमायात काही कथांची भाषा थोडी गावाकडच्या भाषेकडे झुकणारी(कसाब, अंजन), काहींची पांढरपेशी मध्यमवर्गीयांची(प्रदक्षिणा, पुनरपि) तर काहींची संस्कृतप्रचुर (विदूषक, कळसूत्र) अशी आहे. जीएंचे ह्या सर्वांवरील सारखेच प्रभुत्व पाहून आपण थक्क होतो. भाषासौंदर्याची उदाहरणे म्हणजे
..एका वृक्षाआड राहून त्याने हलक्या स्वरात, पण लोहतंतूप्रमाणे रेखीव शीळ घातली.
सारे आभाळच आता अभिषेकपात्र झाल्याप्रमाणे कालगतीचे थेंब ठिबकत होते, आणि त्या प्रत्येक ठिपक्याबरोबर नियतीचा सहस्ररत्न मोरपिसारा चांदण्या चमकावत लहानमोठा होत सारे निर्विकारपणे पहात होता.
त्याने दार लावले. प्रकाशाचा पट्टा पुन्हा आक्रसला व सोनू आत येऊन नुसत्या चटईवर पडला. त्याने दिवा घालवताच प्रकाशाची रेषा एकदम तोडून टाकल्याप्रमाणे नाहीशी झाली व आता वाऱ्याचे धारदार पाते तेथून आत येत राहिले.