भाषावार प्रांतरचनेने तोटे अधिक झाले असेच जरी दिसत असले, तरी हा निर्णय अपरिहार्य होता असे वाटते. दोषच द्यायचा झाला तर तो आपल्यात भिनलेल्या प्रांतीयतेला द्यावा लागेल.

भाषावार प्रांतरचन वास्तविक बरीच आधी सुरु झाली होती. सुशिक्षित बंगाली लोक साऱ्या नोकऱ्या बळकावतात, म्हणून इंग्रजी अमलामधेच बिहारी लोकांनी १९१२ मधे स्वतंत्र राज्य पदरात पाडून घेतले. विदर्भ मध्यप्रांतात असताना हिंदी भाषकांना झुकते माप दिले जाते, हा होणारा आरोप आणि मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई असताना आणंद विद्यापीठाला होणारे सढळ सहाय्य पाहून भाऊसाहेब हिऱ्यांनी मराठी भाषक भागात असे विद्यापीठ काढण्याचा केलेला प्रयत्न ही काही, द्वैभाषिक राज्यांतही भाषिक भावना प्रबळ असण्याची, छोटी-मोठी उदाहरणे.