रहदारीचे नियम तोडणं ही संस्कृती झाली आहे. पुण्यात रहदारी नियंत्रकाचा लाल दिवा पाहून थांबणाऱ्या ४-५ मूर्खांतला मी एक आहे. (ह्याचा मला अभिमान आहे, हा मूर्खपणाचा कळस.) अनेक सुशिक्षित (आणि सुशिक्षितच) सरळ जाण्यासाठी, डाव्या बाजूला वळण्याच्या मार्गिकेत आपली वाहने उभी करतात. त्यामुळे ज्यांना डाव्या बाजूला वळायचे असते त्यांना, हिरवा दिवा असूनही, (सरळ जाण्याचा दिवा हिरवा होईपर्यंत) ताटकळत उभे राहावे लागते. त्याने ते वाहनचालक संतापून आपल्या गाडीचा कर्णा जोरजोरात वाजवत बसतात. समोरचा माणूस 'हे' आपल्यासाठी नाहीच अशा चेहऱ्याने मख्खासारखा बसून राहतो. अशाने आवाज प्रदूषणही वाढते.
दुचाकीवाले सर्रास विरुद्ध दिशेने रहदारीत घुसून सरळ कायद्याने चालणाऱ्या वाहन चालकास त्याचा वेग कमी करण्यास आणि/किंवा गतिरोधकाचा जोरदार वापर करून वाहन उभे करण्यास भाग पाडून निघून जातात. सरळच्या प्रवासातही दोन वाहनांच्या मधल्या चिंचोळ्या जागेतून आपली दुचाकी घुसडून, अचानक, बाजूच्या चारचाकी वाहनाच्या समोर येऊन आपला वेग कमी करतात आणि इतरांना अडचणीचे आणि स्वतःच्या जीवाला घातक असे वागतात. ह्याला ते रहदारीतले 'कौशल्य' मानतात. हे सर्व सुसंस्कृत घरातले आणि सुशिक्षितच असतात. रिक्षावाल्यांवर वेगळा लेख होऊ शकेल. डाव्या बाजूला कितीही जागा असली तरीही मागच्या वाहनाचा मार्ग अडवत सावकाश रिक्षा चालवणं हा स्वतःचा हक्क समजतात.

गणेशोत्सवासाठी, एकमेकांशी स्पर्धा करणारे, मंडप रस्त्यांवरच बांधणे, त्या साठी रस्ते खोदणे अशी समाज विघातक कामं बिनदिक्कत चालतात. आणि अशा गणपतींची आरास बघायला, भक्तिभावाने नमस्कार करायला १००% टक्के सुशिक्षित (?) जातात. लाडू-पेढे-नारळ-दूध असे अनेकविध खाद्यपदार्थ कुठलाही नैवेद्य न मागणाऱ्या, न खाणाऱ्या देवाला अर्पण करून आज आपण भरपूर पुण्य प्राप्त केले अशा बेगडी समाधानात, स्वतःलाच फसावीत, अनेक सुशिक्षित जगतात.

सुशिक्षितांचा हा वाढता अशिक्षितपणा अतिशय गंभीर आहे असे मला वाटते.