माफ करा मंडळी,
'प्रशासकाची लुडबूड' हे वाचून राहवलं नाही म्हणून बोलते. अवाजवी वाटल्यास सोडून द्यावे.
हा प्रतिसाद काढाकाढीचा इतिहास सगळा नसला तरी थोडाफार माहिती आहे. माझ्याही पूर्वीच्या काही प्रतिसादांना कात्री बसलेली आहे. पण प्रशासनाने आपली भूमिका का स्पष्ट करावी? त्यांना जाब विचारणारे आपण सर्व कोण? प्रशासकांचे काही विशीष्ठ विचार, काही भूमिका, काही जणांच्या विचारांप्रत जास्त सहमती का बरं असू नये? ते आपले इतर व्याप सांभाळून आणि वेळोवेळी सुधारणा करुन स्वखर्चाने मनोगत चालवत आहेत. मनोगताने मला बरंच काही दिलं. मराठी भाषेतील अनेक शब्द, प्रचंड सामान्य ज्ञान,रोजच्या कामातून थोडा विरंगुळा,छंद आणि मात्रांचे नियम,गणिताचे आणि भूगोलाचे ज्ञान,अनेक न पाहिलेले मित्र मैत्रिणी..बरंच काही. आणि या सर्वांबद्दल मी मनोगताशी कृतज्ञ आहे. मनोगताला मिळालेला स्पर्धेतला क्रमांक, इमेलातून बऱ्याचदा फिरत फिरत येणारे 'गुड वन..मस्ट रीड' 'प्रिंट स्क्रीन' केलेले मनोगतावरील कविता, विनोद हे सर्व मला मनोगताच्या लोकप्रियतेचं प्रतिक वाटतं. लोकांना मराठी भाषा आंतरजालावर लिहावी-वाचावी-प्रत करुन दुसऱ्याला पाठवावीशी तरी वाटते. आपल्या इंग्रजी वाचायचा कंटाळा असलेल्या आईवडीलांना वाचायला चांगले साहित्य आंतरजालावर दाखवता येते. या सर्वांच्या बदल्यात असेल प्रशासकांचा प्रतिसादाच्या भाषेवर कटाक्ष, तर काय बिघडलं?
(डिसक्लेमरः मी जुन्या मनोगतींपैकी नाही, नव्यांपैकी पण नाही, मी कोणत्याही कंपूच्या वतीने बोलत नाहीये,कोणालाही 'असे करा' म्हणून शिकवत नाहीये. आणि हा प्रतिसाद उडाला तरी माझी काही हरकत नाही.)