भाऊ,

तुमच्या शेवटच्या दोन परिच्छेदांमुळे लेख अधिक परिणामकारक होऊन काळजाला भिडला. दगडी खूपच भावली.

तुमचा लेख वाचतावाचता किसनबाबांची आठवण कधी आली कळलं देखिल नाही. अगदी साधासरळ माणूस.. धोतरसदऱ्यातली त्यांची उंचेलीशा बांध्याची छबी आजही डोळ्यासमोर तशीच्या तशी उभी राहते. कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही..गळणारा नळ ठीक करण्यापासून ते ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यापर्यंत, बागेत सुरेख कटाई करून द्यायला मदत करण्यापासून ते अख्खी आळी झाडून स्वच्छ करण्यापर्यंत कुठल्याही कामात अगदी वाघ म्हणावेत असे होते. कुठलीही अडचण आली की अख्ख्या कॉलनीत,"किसनबाबांना बोलवा." हेच शब्द तोंडून निघायचे. उन्हातान्हात काम करून पाऽऽर काळवंडलेली काया पण करत असलेलं काम पूर्ण केलं की त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची लकाकी.. निव्वळ सुभानल्लाह ! डोळे नेहमी लालेलाल आणि हाड न् हाड दिसेल इतपत कडकडीत अंगकाठी होण्याइतकी पोखरून सोडेल इतकी त्यांनी दारू-बिडीला त्यांच्या आयुष्यात मुभा दिलेली, पण म्हणून कोणाशी कधीही कुठलंही दुर्वर्तन असे ऐकण्यात नाही. त्यांनी झोकलेली असली आणि कोणी त्यांना काही कामानिमित्ताने,"किसनबाबा.." हाक मारली तर अगदी मानही वळवून न बघता सरळ घरी निघून जायचे आणि मग नंतर घरी येऊन,"काय काम काडलंसा.." असं विचारायचे. अख्ख्या कॉलनीचा काळजीहर्ता असा अगदी लाख माणूस ! 
आणि त्या दिवशी...... होऊ नये ते झालं.. ९८% भाजलेल्या अवस्थेत सरकारी दवाखान्यात ३ दिवस जगण्यासाठी निकराचा लढा देत अखेरीस किसनबाबा गेले ! कर्णोपकर्णी ऐकायला मिळाली ती माहिती अशी.. नेहमीप्रमाणेच जबरदस्त झोकून ते घरी गेलेले. घरातले सगळेजणं कुठल्यातरी मुद्द्यावर चर्चा करत होते. चर्चा होताहोता तावातावाने भांडण सुरू झालं. रागारागात त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं आणि ... घरातल्याच दुसऱ्या कोणीतरी काडी पेटवून...

आजही आमच्या घरी कुठला कार्यक्रम असला किंवा काहीही काम निघालं की किसनबाबांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. कितीवेळा त्यांना कॉलनीतल्या सर्वांनी समजावलं असेल दारू कमी करण्याबाबत पण.... "किसनबाबा, तुम्ही तेव्हा ऐकलं असतंत तर आज तुम्ही आमच्यात असतात. तुमची खूप आठवण येतेय असं म्हणावं न लागता सरळ येऊन भेटता आलं असतं तुम्हाला..."