सर्वात आधी हा खुलासा केला पाहिजे की "अप्रस्तुत" हा शब्द कुठल्याही रीतीने टीका करण्यासाठी वापरलेला नाही. येथे त्याचा एवढाच अर्थ आहे की त्या विषयाशी संबंधित नसलेले. म्हणजे असे म्हणावयाचे आहे की संगीताचे कितीही वर्णन केले तरी त्याने संगीताचा प्रत्यक्ष अनुभव येणे शक्य नाही.
या दृष्टीने पहाता तात्यांचेच कशाला माझे स्वतःचेही संगीताविषयीचे बहुतेक लिखाण संगीताच्या प्रत्यक्ष अनुभवाशी प्रस्तुत ठरणार नाही.
पण याचा अर्थ असा घेता कामा नये की असे लिखाण करूच नये किंवा करणे चुकीचे/अयोग्य आहे, तर असा घ्यावा की असे लिखाण कलेच्या दुसऱ्या प्रकारात मोडले पाहिजे, उदा. साहित्य. संगीताविषयीचे सर्व लिखाण त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य किंवा उपयोगाचे असू शकते.
अगदी थोडक्यात सांगायचे तर संगीत हे शब्दातीत असते हेच वेगळ्या प्रकारे म्हटले आहे. काही गैरसमज झाला असल्यास तसा उद्देश नव्हता.
एक्स्ट्रानियस म्हणजे एखाद्या विषयाच्या बाहेरचे. संगीताचा अनुभव हा प्रत्यक्ष अनुभव आहे. शाब्दिक वर्णनाने त्याची जागा भरून काढता येणार नाही. पण त्याकडे आकर्षित करून घेता येऊ शकेल.
रिडंडंट म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक. म्हणजे संगीताचा अनुभव येण्यासाठी शब्दांची आवश्यकता नाही. चिजेत शब्द असले काय किंवा निरर्थक अक्षरे असली काय रागाचा परिणाम तोच राहील.
हा सर्व माझा वैयक्तिक दृष्टिकोण आहे. हे मला खरे वाटते, सर्वांना वाटले पाहिजे असा आग्रह धरणे योग्य होणार नाही. प्रत्येकाने स्वतः तो अनुभव घेऊन निष्कर्ष काढावा. मी प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व देतो, बाकी सर्व मला लेखात म्हटल्याप्रमाणे "बाह्य वस्त्रे" वाटतात.
[अवांतरः अप्रस्तुत शब्दाचा आणखी एक उपयोग खालीलप्रमाणे.
कला ही कला. कलावंत सच्चरित्र आहे की बदफैली आहे, निर्व्यसनी आहे की बेवडा आहे, त्याने कलेसाठी कष्ट घेतले की त्याला ते सहजपणे आले हे सगळे माझ्या मते अप्रस्तुत आहे. "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" असा हा मामला आहे.
हां, तो सच्चरित्र, सत्प्रवृत्त असेल त्याच्याविषयी आदर वाढेल. पण तो सुरात गात नसेल तर त्याची कारणे देऊन काही साधणार नाही, बेसूर तो बेसूर, त्याला क्षमा नाही.]
तात्याजी,
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने तुमचा व माझा स्वभाव वेगळा असणारच. पण त्याने काही बिघडते असे मला वाटत नाही. आणि तुम्ही समजता तितका काही तो वेगळाही नाही.
सगळी पुस्तके फेकून देऊन प्रत्यक्ष मैफ़िल जमवणे मलाही सर्वाधिक पसंत आहे. संगीताची मजा व रस पुस्तकात कुठून येणार? म्हणजे याबाबतीत सर्व पुस्तके अप्रस्तुत.
येशुदासाचे गाणेः मी तुमच्याशी सहमत आहे. नुसत्या आरोहांनी किंवा चमत्कृतीने संगीत होत नाही, होऊ शकत नाही. पॉज़चे महत्त्व व अवरोही पोकळी भरून काढण्याचे काम मला मान्य आहे.
पण मला कोणी सांगितले असते की नुसत्या आरोहांचे गाणे असू शकते तर माझा तरी विश्वास बसला नसता. ते या ना त्या प्रकारे त्यांनी करून दाखवले म्हणून मी इलयराजा व येशुदास यांच्या कल्पनेला व कौशल्याला दाद देतो.
यमन राग मला सर्व ताण-तणाव काढून टाकून मन शांत करणारा वाटतो.
आणि वर म्हटल्याप्रमाणे तुमचे (पुस्तकांचे नाव न काढता) यमनाची मैफ़िल जमवायचे आमंत्रण मी स्वीकारले आहे, प्रत्यक्ष जमेल/होईल तेव्हा खरे. पण लिंबू-पाणी न घेता हं, यमन पातळ होईल त्याने.
मिलिन्द,
यमन हा मागे वसंतराव म्हणाले होते त्याप्रमाणे श्रीमंत राग आहे, कितीही उदाहरणे दिली तरी समाधान होणार नाही. पं जसराजांची "जा जा रे पागल मनवा, तेरी कौन सुने किसको परवा" ही चीज द्यायची राहून गेली याचीही मला हळहळ वाटते. पण उद्देश यमनातील सर्व चांगले द्यायचा नव्हताच, तर सर्वांना माहीत असेल असे काही दाखले देणे हा होता. अर्थात त्या क्षणी पटकन आठवले तेवढे दिले गेले.
आणि हो, मला गुरू मानू नका, तेवढा भार नको माझ्यावर. अहो "एकाहुन एक चढी जगामधि, आपला तोरा मिरवु नको" या अनंतफंदींच्या ओळीची मला पूर्ण जाणीव आहे. गुरू मानायचे तर असल्या तुटपुंजे ज्ञान असलेल्याला कशाला, एखाद्या खऱ्या ज्ञात्याला माना, निश्चित मिळतील तसे कोणीतरी. नाणे दहा वेळा वाजवून खात्री करून मग स्वीकारा.
(आता फक्त तात्यांना चिडवायचे म्हणून तसे म्हटले असेल तर चिंता नको, मी हलकेच घेईन.)
ते सर्व असो, तत्काळ गाण्याचा दुवा देऊन जी जाणकारी दाखवलीत त्याला माझी दाद. खरं सांगू, मी स्वतः वर्षानुवर्षे हे गाणे शोधत बसलो होतो, आणि तुम्ही क्षणार्धात त्याला हजर केलेत- मानलं.
शशांक,
तुम्ही जो आक्षेप घेतलात तो बरोबर आहे, पण काही वेळा भावनेच्या भरात माणूस लिहून जातो.
कारकून, विश्वमोहिनी,
रस घेऊन वाचल्याबद्दल धन्यवाद.
दिगम्भा