अतिशय सुरेख आणि उत्कंठावर्धक अनुभवकथन.
पतंगाचा मांजा करण्यासाठी, दुपारी आई झोपली असताना, मी घरच्या वापरातल्या खलबत्त्यात काचा कुटल्या होत्या. आईला जाग आली आणि माझे प्रताप पाहून तिने मला कुटले होते.
मातीच्या गणपतीचा (साच्याविना) एकदाच प्रयोग केला होता. मुकुट जमला नाही त्यामुळे टकलू गणपती बनवून नंतर त्याला पुठ्ठ्याचा सोनेरी मुकुट घालू असा विचार केला. तयार झालेली मूर्ती (?) सावलीतच वाळावयास ठेवली होती. (उन्हात ठेवली तर तडे जातात असा समवयीन तज्ज्ञांनी सल्ला दिला होता.) तासाभराने पाहतो तर गणपतीचा बेसनाचा लाडू झाला होता. मूर्ती (?) अर्ध्या उंची पर्यंत ओघळली होती. सोंड खाली पडली होती, कानाची घडी झाली होती. मातीत पाण्याचे प्रमाण (बरेच) जास्त झाले होते. मला फार वाईट वाटले. देवाच्या मूर्तीची (?) विटंबना झाल्यामुळे आता गणपती आपल्याला परीक्षेत नापास करतो की काय अशी भिती वाटू लागली. देवळातल्या गणपतीसमोर क्षमा याचना करीत, पुन्हा असे करणार नाही याची ग्वाही देत, अनेक वेळा नाक घासले. तेंव्हा कुठे देवाने क्षमा केली आणि मी परीक्षेत पास झालो.