काही मनोगतींचा सूर एकूण ' जे जुने ते टाकावू ' वा ' चालू युगात ते उपयुक्‍त नाही ' असा दिसतो. माझा रोख श्री मिलिन्द ह्यांच्याकडे आहेच पण त्यांच्या अशा प्रकारच्या विचारांचा पुरस्कार करणारे आणि इतरही आहेतच.
      टग्या आणि शशांक ह्यांनी प्रतिसादातून " आपापल्या स्वभावानुसार जे करणे योग्य वाटते ते केले असतां 'भयावह' परिस्थिती निर्माण होत नाही " हे फारच चांगल्या रितीने पटविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांचे विश्लेषण हे श्लोकाच्या अर्थाला धरूनच आहे. फक्‍त पैसा जास्त मिळतो म्हणून कुणा डॉक्टरला जर वकील व्हावेसे वाटले तर खुशाल व्हावे (दोघेही वैश्यच), पण डॉक्टर पैसे घेत असला तरी त्याचा त्या क्षेत्रात एक सेवाभाव असतो, आपण देत असलेल्या उपचारामुळे पेशंट बरा व्हावा ही भावना असते. वकीलाला यशस्वी वकील होण्यापुरताच लढत असलेल्या केसमध्ये रस असतो. त्या profession ला डावपेचाची आवश्यकतता असते, आणि त्यास अनुकूल असा आपला (स्व)भाव असणे हे त्या क्षेत्रात यश संपादन करायचे असल्यास आवश्यक आहेच ना ?      
        कुशाग्र म्हणतात ' मोरूचे गृहीतच ' चुकीचे आहे हे बरोबर वाटते. मोरू ज्याला विरोधाभास म्हणतात तो विषयच वेगळा आहे. वर्ण स्वभावानुसार स्वधर्म आणि गुण ग्रहण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोणाचा कोणताही (स्व)धर्म असो, त्यात चांगले गुण ग्रहण करणे व निंदनीय गुण त्याज्य करणे हे होऊ शकते एवढेच नव्हे, तर आपल्यात दोष वाटत असतील तर तसे करायलाच हवे.  
      मला वाटते शास्त्रकारांनी मनुष्य जातीचे स्वभावानुसार जे चार वर्ण बनविले ते फारच विचारपूर्वक केले आहेत. मुळात ते वर्ण जन्मानुसार ठरविलेले नाहीतच. प्रत्येक वर्णाची जो जशी योग्यता संपादन करतो त्याप्रमाणे ते होते. तसेच एकाच आयुष्यात वर्ण बदलण्याची तरतूदही त्यात होतीच. विश्वामित्र क्षत्रिय होता, वाल्या शूद्र होता, पण पुढे ते ब्राह्मण झाले. ब्राम्हणांचा धर्म ज्ञान संपादन व वितरण करणे. पैका कमविणे हे त्याच्यासाठी त्याज्य होते. पण त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी इतर वर्णीयांची जबाबदारी होती. (हे आपण conveniently विसरतो) अत्यंत सात्त्विक वृत्ति/आचरण हा त्याचा स्वभाव होता. अन्याय होऊ न देणे, जन रक्षण हे क्षत्रियाचे धर्म, त्याच्यासाठी रक्‍तात खुमखुमी असणे (राजस), निर्भयता  इ. हे आवश्यक गुण. पण म्हणून रक्‍तात खुमखुमी असलेले सर्वच (अतिरेकी?) क्षत्रिय नव्हेत. व्यापारी, शेती, डॉक्टर, वकील, नटनट्या, ब्युटिशियन, संगणक व्यवस्थापक इ. इ. (professional & self employed) हे सर्व वैश्य मध्ये मोडतात. जेथे डोक्याचा (बुद्धीचा) वापर करावा लागत नाही असे जे कुठले काम (उपजीविकेसाठी) करावे लागणे ते सर्व शूद्र. उदा : आपण क्लास फोर कामगार (फाईल आण वगैरे) म्हणतो ते, गवंडी वगैरे. एवढे असून सुद्धा आपत्‌काळी एका वर्णीयाला इतर वर्णीयांची कामे करायची मुभा होतीच. वर्णाश्रमातील व्याख्येनुसार बनविलेले वर्ण हे चुकीचे नाहीत. फक्‍त समाजाने ते जन्मानुसार मानून झुगारून टाकले एवढेच.
        आता एक सांगा, जन्म वा वर्णाश्रमानुसार कोणी एखादा आता शूद्र वा वैश्य आहे, त्याची वृत्ति सात्त्विक व्हायला लागली, त्याचा ब्रह्मविद्या संपादन करण्याकडे (आणि अर्थात ते वाटण्याकडे) कल झाला.  पण म्हणून त्याच्या उदर-निर्वाहाची जबाबदारी इतर वर्णीय (चालू काळात) घ्यायला तयार होतील का ? पण असा ब्राह्मण जर भिक्षुकी करीत असेल, आणि त्याला आपण पूजा वगैरे साठी बोलाविले असेल तर त्याने आपण जी ' दक्षिणा ' देऊ ती मुकाट्याने घेऊन गप्प बसावे असे आपल्याला वाटते. त्याचा उदरनिर्वाह ह्यात कसा होईल ही आपली जबाबदारी अजिबात नाही असे आपले ठाम मत असतेच ना ? मग त्याने करावे काय ? [ मी भिक्षुकी करत नाही बरं ]
        गीतेचा श्लोक वरील स्व-भावानुसार ज्याचा स्वधर्म क्षत्रिय होता अशा अर्जुनाला उद्देशून होता आणि आजही तो ग्राह्यच आहे. भगवान म्हणतात जरी त्याला त्यात 'विगुण' दिसत असले आणि ब्राह्मण धर्म (परधर्म) असलेला वर्ण उच्च प्रतीचा वाटत असला तरी त्याच्या (अर्जुनाच्या) स्व-भावानुसार त्याने क्षत्रिय धर्माने वागणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे.  कारण तो दुसरा धर्म त्याला पेलण्यासारखा नाही म्हणून तो 'भयावह' आहे. त्याच्या स्वभाव धर्मानुसार तो अंतिम साध्य साधून देणारा नाही.
       हे जाणून न घेता ते शास्त्रात जे काही सांगितले आहे ते सर्व outdated म्हणून टाकावू असा हट्ट करणे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्यानेच विचार करून ठरवावे.