चातुर्वर्ण हे प्रत्यक्ष गुणकर्मावर आधारीत होते हे चलाखीचे विधान आहे असे मला वाटते. मुळात असलेल्या विषमतेच्या तत्वज्ञानाचे समर्थन करण्याची एक पद्धत आहे इतकेच. विश्वामित्र, वाल्मिकी यांची उदाहरणे ही अपवाद म्हणून येतात हे लक्षात ध्यायला हवे. असे वर्णबदल जर सार्वत्रिक असते तर मग एवढे तपशीलवार नियम -मुख्यतः नकारात्मक- करण्याची काही आवश्यकता नव्हतीच.

मुख्यतः चार वर्णांच्या उत्पत्तीबद्दलची कथा जी प्रचलित आहे ती असे सांगते की या चार वर्णाचे लोक ब्रह्म्याच्या (चु. भू. द्या घ्या) अनुक्रमे डोक्यापासून, स्कंधापासून, मांडीपासून आणि (बहुधा) तळव्यापासून उत्पन्न झाले आहेत. आता असे जर असेल तर एका वर्णाची व्यक्ती दुसऱ्या वर्णात जाणे कसे शक्य आहे, ते जन्मानेच त्या वर्णाला बांधले गेले नाहीत का?  गंमत अशी की 'गुणकर्मा'चे समर्थक ही कथा प्रक्षिप्त आहे असे मानतात, तर विरोधक हे 'गुणकर्मा'बद्दलचा श्लोक प्रक्षिप्त मानतात. (मी दुसऱ्या प्रकारात मोडतो. त्यासाठी अन्य काही आधार आहेत, पण त्यात शिरत नाही कारण इथे माझे वैयक्तिक मत काय हे महत्वाचे नाही)

गुरुवर्य कुरूंदकरांनी या युक्तिवादातील फोलपणा दाखवून दिला आहे. (पुस्तकाचे आणि लेखाचे नाव आठवत नाही, पाहून सांगतो).

गीतेत अनेक श्लोक हे प्रक्षिप्त आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूटने अतिशय परिश्रमपूर्वक गीतेची एक आधारप्रत तयार केली आहे त्यात वरील श्लोक आहे की नाही ते पहायला हवे.

-विचक्षण