नरेंद्रराव,

अतिशय सुंदर माहिती. काल रात्री उशीरा माझी नजर तुमच्या लेखांवर पडली आणि एक बैठकीत सगळे वाचूनही काढले. (माझ्या दुर्दैवाने मला हा विसावा लेख शेवटीच सापडला त्यामुळे बाकीचे शोधा मधून हुडकावे लागले. असो.)

तुमचा अभ्यास, तळमळ आणि लिहिण्याची पद्धत सगळेच आवडले. बहुतेक सर्वच विचार अगदी मनापासून पटले. अमलात आणण्यास जरी थोडे कठीण असले तरी मी तरी प्रयत्न करतो. (तसे म्हटले तर सोपे काय असते? शाळेतला अभ्यास, कचेरीतले काम, स्वयंपाकघरातला स्वयंपाक हे तर कितीतरी कठीण पण आपण करतोच ना! फक्त तत्काळ मोठे फळ मिळत नाही आणि टाळले तरी चालते म्हणून व्यायामादि गोष्टी टाळल्या जातात.)

माझाच अनुभव सांगतो. मला मायग्रेन (अर्धशिशी?) चा त्रास आहे. साधारण नववी-दहावीपासून. २-३ वर्षातच आठवड्याला १+ वेळापर्यंत तो वाढला. आणि यावर ठोस असे औषध काही नाही. डॉक्टरांचा सल्ला आणि जालावरून कळले की प्रत्येक रोग्याचे काही उद्दीपक (triggers) असतात जे मायग्रेनला प्रवृत्त करतात आणि अशा उद्दीपकांची साधारण यादी खूपच मोठी होते.

आधी मी नुसता अंदाज घेत होतो की मला कशामुळे त्रास होतोय तो. पण काही कळत नव्हते. शेवटी ठरवले की नीट अभ्यास केल्याशिवाय हा प्रश्न काही तडीस जाणार नाही. सुमारे दोन वर्ष प्रत्येक त्रासानंतर त्याआधी केलेल्या/खाल्लेल्या/हुंगलेल्या गोष्टींची नोंद ठेवली. एवढेच नाही तर मानसिक स्थितीची पण नोंद ठेवली. सरतेशेवटी सगळ्या नोंदींचा अभ्यास केला आणि बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. आपले शरीर कसे आहे आणि कसे वागते हे जाणून घेणे फारच मनोरंजक असते (आणि फायद्याचेही). आणि हो, बहुतेक वेळा हे सगळे उद्दीपक अनैसर्गिक गोष्टींत असतात हे सांगणे न लगे. (जसे माझ्यासाठी रफ़ल्स् च्या चिप्स, काही शीतपेये, रात्रीची अपुरी झोप, मानसिक ताण इ. इ.)

यानंतर उद्दीपक टाळणे आणि व्यायाम असा दुहेरी उपाय सुरू केला आणि सध्या मला साधारणपणे २ महिन्यातून एकदा त्रास होत असेल. मला पण खूप इच्छा होती की तुमच्यासारखे इतरांना हे सांगावे पण मायग्रेनसाठी प्रत्येकाचे शरीर वेगळे अभ्यास वेगळा आणि उपायही वेगळे.

असो.

अजून एक गोष्ट जी माझ्या आताच लक्षात आली ती म्हणजे व्यायामानंतर ताणण्याचे (stretching) (स्नायू-तनन कसा आहे) महत्त्व. मी आधी जो व्यायाम केला त्यात स्नायू तनन कधीच केले नाही. परिणामी फुगून दणकट दिसणारे स्नायू  आतून लांबीला कमी होत राहिले. असे स्नायू लवचिक राहत नाहीत आणि सहज दुखावतात. सद्ध्या त्यादृष्टीने प्रयत्न चालू.

कदाचित संशोधन हा स्वभाव असतो. शोध करणाऱ्याला प्रश्नही सापडतात आणि कदाचित उत्तरेही. असो. (शोध करणाऱ्यांना / न करणाऱ्यांना देव करो आणि प्रश्नही न गाठोत हीच सदिच्छा)

तुमचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन.