प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
उत्तरे -
१. पुढील महिन्याच्या सुरुवातीस जी व्याख्या प्रसृत केली जाईल ती हीच असेल की त्यात काही बदल/सुधारणा होण्याची शक्यता आहे?
------ पुढील महिन्यात प्रसृत होणार होती (असे मी ग्रहदशेमध्ये लिहिले होते) तीच व्याख्या ह्या लेखामध्ये दिलेली आहे. प्रागमधील खगोलविदांच्या संमेलनानंतर नवीन व्याख्या प्रसृत होईल असे इं. ऍ. यु. ने कळवले होते. मात्र ही नवीन व्याख्या संमेलनानंतर लगेच प्रसृत होईल वा काही दिवसांनी होईल हे स्पष्ट केलेले नव्हते. त्यामुळे मी अंदाजे 'पुढील महिन्याच्या सुरुवातीला' असे लिहिले होते. मात्र संमेलन संपल्यावर लगेच नई व्याख्या प्रसृत झाली जी ह्या लेखामध्ये दिली आहे. गोंधळाबद्दल क्षमस्व.
२. कायपर पट्टा म्हणजे काय?
------ नेपच्यूनच्या कक्षेबाहेरील अवकाशातील सूर्यापासून सुमारे ३० ते ५० खगोलीय एकक अंतरादरम्यानच्या तबकडीसदृश आकाराच्या प्रदेशाला कायपर पट्टा असे म्हणतात. (पृथ्वीचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर = १ खगोलीय एकक). ह्या पट्ट्यामध्ये छोट्या अनेक बर्फाळ वस्तू आहेत. सूर्याभोवतीची धूळ आणि वायू मिळून ग्रह तयार झाले. त्या धूळ-वायूच्या ढगातील बहुतांश वस्तुमान हे अष्टग्रह तयार होण्यात वापरले गेले. मात्र ह्या ढगाच्या सूर्यापासून लांब असलेल्या भागातील उरलेसुरल्या वस्तुमानाच्या ह्या छोट्या बर्फाळ वस्तू बनल्या आणि त्या सूर्याभोवती फिरत राहिल्या. छोटा आवर्तनकाल असलेल्या धूमकेतूंचा उगम ह्या पट्ट्यात होतो असे सांगणाऱ्या जिरार्ड कायपर ह्या डच-अमेरिकन खगोलतज्ञाच्या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.
३. लघुग्रह म्हणजे ज्यांना साध्या भाषेत आपण उल्का म्हणतो तेच का?
------ नाही. अवकाशातील एखादी वस्तू, दगड पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये सापडल्यामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. ह्या दगडाने पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला की हवेबरोबरच्या घर्षणाने तो हवेत पेट घेतो. जर हा दगड छोटा असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडण्यापूर्वी, वातावरणातच जळून जातो, ज्याला उल्का असे म्हणतात. मात्र हा दगड मोठा असेल तर ज्याचा काही भाग वातावरणात जळून गेला तरी उर्वरित भाग जमिनीवर पडतो, त्याला अशनी असे म्हणतात. लोणारसारखी विवरे ही अशनीपाताने तयार झालेली आहेत.(उल्कापाताने नव्हेत, कारण उल्का जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत.)
मंगळ आणि गुरू ग्रहादरम्यानच्या भागामध्ये एका विशिष्ट पट्ट्यामध्ये लहान-मोठे लाखो दगड सूर्याभोवती फिरतात, त्यांना लघुग्रह (ऍस्टेरॉइड्स) म्हणतात. तिथे पूर्वी एखादा ग्रह होता आणि गुरूच्या कचाट्यात सापडल्याने त्याच्या ठिकऱ्या उडाल्या आणि त्या ठिकऱ्या त्या ग्रहाच्या कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरतात असा एक सिद्धांत सांगतो, तर तिथे (गुरूमुळे?) ग्रह तयारच होऊ शकला नाही, मात्र तेथील धूळ आणि वायूचे मिळून लहान-मोठ्या आकाराचे दगड तयार झाले आणि सूर्याभोवती फिरायला लागले असे एक सिद्धांत सांगतो.