नियम हे केवळ दिशा दाखवण्यापुरती हवेत. त्यांचा खल जास्त झाला तर मूळ (विचार) तसाच राहतो.

पटत नाही. याच धर्तीवर उद्या सर्व वर्तमान पत्रांनी, मराठी वाहिन्यांनी अशुद्ध भाषेचा वापर सुरू केला तर ते मान्यताप्राप्त होऊ शकते का? स्वत:चे विचार आपण कसे आणि कुठे मांडतो त्यावर भावना महत्त्वाच्या की शुद्ध भाषेचा आग्रह महत्त्वाचा हे वाचक ठरवत असतात.

पन/लोनी असं कानावर आलं /कागदावर दिसलं की कानात झुरळ गेल्यगत प्रतिक्रिया देणारे/अंगावर शहारे आणणारे या/अशा आपल्या प्रतिक्रियेने कवाडं बंद करुन घेतात.

यावाक्यावरून आपल्याला भावने पेक्षा भाषेवर भाष्य करायचे आहे असे वाटते.

एक उदाहरण म्हणून, बहिणाबाईंच्या ओव्या, गाणी ही अहिराणी भाषेत आहेत, या भाषा अशुद्ध नाहीत तर त्या बोली भाषा आहेत. परंतु त्या कागदावर उतरवताना आणि छापताना व्याकरणाचे नियम लावूनच छापल्या जातात. म्हणजे बोली भाषा आणि लिखित भाषा हे वेगळे प्रकार आहेत.

बहिणा बाईंच्या कविता झाल्या म्हणून --

माझि मय सरुसती, माले शिकविते बोली लेक्बहीणाईंच्या मनि कीति गुपीतं पेरलि असं कुणी लिहीत नाही.

माझी माय सरोसती,
माले शिकविते बोली,
लेक बहिणाईच्या मनी,
किती गुपितं पेरली

हे असंच लिहिलं जात.

लोकांनी वेगवेगळ्या बोली भाषा आहे तशाच स्वीकारल्या आहेत, पण लेखी नियम सर्वत्र सारखेच ठेवले आहेत.

अभिव्यक्तीकडे पाहायचे झाल्यास बहिणाबाईंना कधी शुद्ध भाषेचा आग्रह केल्याचे किंवा त्यांच्या ओव्या शुद्ध भाषेत भाषांतरित करायचे खोडसाळ प्रयत्न झालेले नसावेत. परंतु त्यांची अशुद्ध भाषा ही त्यांच्या अभिव्यक्तीकडे पाहूनच स्वीकारली जाते. हीच भाषा लो. टिळकांनी, आगरकरांनी किंवा सावरकरांनी वापरली असती तर मान्य झाली नसती हे बहुधा त्यांच्या अभिव्यक्तीकडे पाहून लोक ठरवतात. मनोगतावरच ताजं उदाहरण द्यायचं झालं तर भांडारकरांनी अपहरणाच्या लेखांत भाषांतर करताना अपहरणकर्त्यांच्या तोंडात गावरान भाषा घातली. एक वेगळा प्रयत्न म्हणून लोकांनी ती स्वीकारली. परंतु त्यांनी लिहिताना शुद्धलेखनाचे नियम पाळूनच लेख लिहिले. तेंव्हा भावने बरोबरच भाषा आणि अभिव्यक्ती हे ही महत्त्वाचे.

सावरकरांचे शुद्ध भाषेबद्दल प्रेम पाहता त्यांचे आणि त्यांचाविषयक साहित्य अशुद्धलेखनात लिहिणे आणि ते वाचणे हे अनेक व्यक्तींना तापदायक वाटू शकते.

तसेही अशुद्ध भाषेत "लिहिलेले" विचार दुसऱ्यांपर्यंत जसेच्या तसे पोहचणे हे कठीणच आहे. बरेचदा लेखकाला काय म्हणायचे आहे हेच कळून येत नाही. हे वरील काही प्रतिसादांवरून लक्षात येतेच. माणूस जेव्हा शुद्धलेखनाचा प्रयत्न करत नाही त्या वेळेस दोन गोष्टी लक्षात येतात.

१. शुद्धलेखना विषयी अज्ञान
२. निष्काळजीपणा आणि घाई

दोन्ही गोष्टी त्या लेखकाला मारकच आहेत. अशा गोष्टी जर कोणी सुचवत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना चु. हु. मं. सारखी विशेषणे लावून आपण अधिक लोकांना आकर्षित करू शकता असा आपला गैरसमज नसावा असे वाटते.