सर्वप्रथम मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की नुकतीच ओळख झालेल्या श्री. दिलीप आपटे यांच्या "गीता फॉंन्डेशन" तर्फे चालविलेल्या मसिकातून मी हा लेख उद्धृत केला. हा माझा लेख नाही व माझी अजून अशा प्रकारचे लेखन करण्याची झेपही नाही.
आता तात्या उवाच वर मला काय वाटते ते मी लिहितो -
'मग अशा देहाच्या हृदयात (साजूक तूप रूपी) भगवंत आपणच येऊन बसतो' असे गीता फौंडेशन, मिरज या मंडळींनी म्हटले आहे. अहो पण बुवा, साजूक तुपाचा सात्त्विकपणा आम्हालाही मान्यच आहे की. पण एक सांगा, लोणचंरुपी भगवंतात तरी काय वाईट आहे? जसे साजूक तुपात भगवंताचे सात्त्विक रूप असते, तसे लोणच्यात त्याच भगवंताचे नटखट रूप नसते का? नसू शकेल का?
लोणच्यात काही वाईट आहे असं लेखात मानलेले मला तरी दिसले नाही. लोणचं आणि तूप दोन्ही भगवंत निर्मीत गोष्टीच. लोणच्याला एक दर्प असतो तसा अहंकाराला एक दर्प असतो एवढेच श्री. आपटेंना दाखवायचे आहे. मग त्या बरणीत भरलेल्या वांग्याची मसालेदार भाजी असो, चमचमीत चिवडा असो, मासळी असो वा आंबट ताक असो. ह्यापैकी कुठलाच पदार्थ वाईट नाही. वाईट आहे तो अहंकाररूपी दर्प जो भगवंताला आवडत नाही. कुठल्यातरी पदार्थाचे नाव घ्यायचे तसा लोणचं हा पदार्थ निवडला एवढेच लोणचं ह्या शब्दाचा वापर. तुपामध्येही colestorol असतो म्हणून तोही चुकीचा म्हणता येईल. त्याऐवजी शुद्ध पाणी (जिसमे मिलाये उस रंग जैसा) हाही शब्द वापरता आला असता. पण दुध, लोणी, तूप हे पदार्थ हे सात्विक समजले जातात (आपणही वर मान्य आहे असे म्हटले आहे) आणि भगवंताला सात्विकता आवडते म्हणून तूप ह्या पदार्थाचा रूपक म्हणून वापर. ह्या पलीकडे तूप ह्या पदार्थाला महत्त्व दिले आहे असे वाटत नाही.
शरीरातल्या लोणच्याला नटखट भगवंताच्या मर्यादेत ठेवायचं की त्याचा राक्षस होऊ द्यायचा हे ज्याच्या त्याच्या हातात नाही का?, आणि हे ज्याच्या हातात नाही त्याने मात्र ती बरणी धुऊन-पुसून स्वच्छ करून त्यात सात्त्विकतेचे, वैराग्याचे साजूक तूप भरले पाहिजे, हे आम्हालाही मान्य!
अगदी हेच भगवंताला म्हणायचे आहे. " युक्ताहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मकृत् ... ) पण मी जर भगवंतांनी म्हटलेला एखादा श्लोक लिहीला की ते "जड अध्यात्म" वाटते. पण मला गीता आवडते (इतरांनाही आवडावी असा माझा आग्रह मुळीच नाही असे आवर्जून सांगण्याची मला आता गरज वाटायला लागली आहे)
आपल्या लेखात लोणच्याच्या तुलनेत साजूक तुपाची किंचित भलामण झाली आहे असे आम्हाला वाटते, आणि आमचा नेमका त्याला सौम्य आक्षेप आहे इतकेच आपण समजावे, ही नम्र विनंती.
बरणी स्वच्छ करायची म्हणजे चिकटलेल्या वासना (आजच सकाळी सातारकर बुवा म्हणाले वासना म्हणजे जेथे भगवंताचे (नि)वास नाही ते) संयम, वैराग्य उपायाने घालवायच्या. मग तिथे दर्प असलेल्या लोणच्या ऐवजी कोणताही पदार्थ घ्या वा साजूक तुपाऐवजी आणखी कोणताही पदार्थ घ्या, जो पर्यंत निवडलेले पदार्थ अहंकार व सात्त्विक वृत्ति दाखविण्यासाठी त्या पदार्थांचा रूपक म्हणून वापर केला आहे हे आपण लक्षात घेत नाही तोंवर आपण म्हणता तशी भलावण ही नैसर्गिकच नाही का ?
हां, आता राजसरूपी, तामसरूपी लोणचं किती खायचं, केव्हा खायचं याच्या मर्यादा ज्याच्या त्याने पाळल्या म्हणजे झालं की राव! त्याकरता ती लोणच्याची बरणी धुऊन-पुसून लख्ख करण्याचा खटाटोप का? या मर्यादा ज्याला पाळता येतात त्याच्याकरता आयुष्यातल्या चविष्ट लोणच्याचा (नटखट भगवंताचा) आनंद, ती बरणी धुऊन-पुसून स्वच्छ करून का हिरावून घ्यायचा?
लोणच्याचा आनंद लुटण्याबद्दल अजिबात ना नाही. पण त्याची आसक्ति असेल तर त्या पदार्थाचा जेव्हा अभाव असेल तेव्हां मन अस्वस्थ होते. अस्वस्थ मन प्रसन्न/आनंदी नसते. निर्भेळ आनंद लोणचे खातांना मनाला जसा निर्भेळ आनंद वाटतो तो लोणचे उपलब्ध नसतांनाही टिकावा. बरणी स्वच्छ करायची ती आसक्ति धुवून काढण्यासाठी. लोणचे परत खाता येऊ नये वा सतत तूपच खावे ह्या उद्देशाने नव्हे.
जसे एकाच मनोगतावर विरभि आणि तात्या नांदताहेत, तसे एकाच स्वयंपाक- घरात लोणच्याची आणि साजूक तुपाची, अशा दोन बरण्या राहिल्या म्हणून बिघडलं कुठे? गीता फौंडेशन, मिरज या मंडळींचा नेमकी लोणच्याची बरणी स्वच्छ करून त्यात साजूक तूप भरण्याचा आग्रह का?
पहिल्या प्रश्नाबद्दल मी व्य. नि. पाठवेन. दुसरा प्रश्न - शीर्षक बघूनच जर परमात्म्याविषयी काही ओढ असेल तर अशांसाठी लेखकाने (श्री दिलिप आपटे) हे विचार मांडलेत. भगवंत आपल्या हृदयात ठेवा असा आग्रह केला आहे का ? पण कोणाला अहंकार भगवंतापेक्षा जास्त प्रिय असेल तर तो choice कोणी कोणासाठी नाकारतो का ? खुद्द भगवंतसुद्धा नाकारत नाहीत. पण ते त्याच्याजवळ राहातही नाहीत.
समाजरूपी स्वयंपाकघरात विविध बरण्या असल्या तर उलट त्या स्वयंपाकघराची शोभा वाढेलच की! ज्या बरणीतलं लोणचं जीवनाला छानशी तिखट चव आणतं त्या बरणीकडे भगवंत फिरकतच नाहीत आणि सात्त्विक साजूक तुपाच्या बरणीतच तेवढे वास करतात असे आम्हाला तरी वाटत नाही.
मलाही वाटत नाही. विश्वातली प्रत्येक निर्मिती ही सुंदर आहेच. प्रत्येकाचे आपापले गुणधर्म आहेत. प्रत्येक वस्तूत परमेश्वर आहेच. आपण लोणचं ही वस्तूच वाईट आहे असा लेखकाचे म्हणणे आहे असा समज केलाय का ? त्यांचे तसे म्हणणे असेल असे मला वाटत नाही. अहंकार, आसक्ति हे निर्भेळ आनंदासाठी घातक आहेत एवढेच लेखनाचे तात्पर्य दिसते. कोणताही X किंवा पदार्थ नव्हे. आणि ह्याचे उत्तर आपणच खाली दिले आहे .
अर्थात, आम्ही हेही कबूल करतो की लोणचं हे लोणच्यापुरतंच खाल्लं पाहिजे. पण आम्ही तर असं म्हणू की जो हे लोणचं मर्यादेत ग्रहण करतो, तो भले कुणी वैरागी वा संतसाधू म्हणून जगला नाही तरी एक सामान्य मनुष्य म्हणून उत्तम आयुष्य जगू शकेलच की नाही? आणि असा सर्वसामान्य मनुष्य भगवंताला प्रिय नसतो का?
होय असा सर्वसामान्य मनुष्यच भगवंताला प्रिय आहे. अहंकाराचा ओषटपणा असलेला नव्हे.
विरभिशेठ, आपल्याला कदाचित आमचे विचार पटणार नाहीत. तरीही मनापासून लिहिले आहे एवढेच आम्ही सांगू इच्छितो.
मला तरी ह्यात न पटण्यासारखे असे काहीच दिसले नाही. आणि हे मला पटणार नाही असे आपण जे गृहीत धरले आहे त्याचे कारणही समजत नाही. मूळ लेखात एक लिहिले आहे आणि आपण वेगळे काही म्हणताय असे काही मला आढळत नाही. हां लेख विस्तृत असता तर जास्त बरे झाले असते. कारण आता होते काय, एक उदाहरण घेऊ - कोणी जर म्हटले की उत्तम शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम व प्राणायाम नितांत आवश्यक आहे - तर लगेच 1) म्हणजे व्यायाम प्राणायाम न करणारांचे स्वास्थ्य उत्तम नसते असे आहे का ? 2) अन्य काही उपाय नाहीतच का ? 3) आणि व्यायाम प्राणायाम न करताही चांगले स्वास्थ्य असू शकते मग आपला व्यायाम/प्राणायामाचा आग्रह का ? मग आता विधान करतांना विधान करणाराने ह्या तिन्ही (अथवा अशी अनेक) प्रश्नांची उत्तरेही विधानात घालणे अपेक्षित असते का ?