शैलेशराव, माझेही काहीसे तुमच्यासारखेच होत. फक्त तुमचे लिखाणासंदर्भात होते तर आमचे (काही स्वतंत्र लिखाणाची फारशी अक्कल नसल्याने) वाचनासंदर्भात.
अनेकदा एखादे नवे पुस्तक सहज वेळ घालवण्यासाठी हाती घ्यावे आणि काहीतरी जबरदस्त हाती आल्याने सावरून बसावे आणि बारकाईने वाचावे आणि अक्षरशः डोक्यावरून सहस्रधारांचा वर्षाव व्हावा असे काहीतरी जाणवते. पण बहुधा पुस्तक एका बैठकीत वाचून संपत नाही. पुढच्या बैठकीत हाती घ्यावे तर हवा तसा सूर वा नूर जुळत नाही, आणि तेच लिखाण मनात खोल उतरत नाही असे जाणवते. मग पुन्हा सूर जुळेतो बाजूला ठेवतो. पण अनेकदा असे होते की एखादे पुस्तक अनेक दिवस असेच अपुरे राहून जाते.
काही दिवसांपूर्वी पु̮ लं. चे 'सुजन हो' आणले आणि झपाटल्यासारखे अर्धे वाचून झाले. त्यानंतर आता बाजूला पडले ते पडलेच. असेच काहीसे शास्त्रीय संगीताच्या काही ध्वनिमुद्रिकांचेही होते.
तात्पर्य तुम्हाला न सांगता कळले असेलच तरी सांगतो. लेखकाला/कवीला मूड असतात तर आम्हा वाचकांनाही असतात. जे आज उमगले वा भावले नाही ते 'दुसऱ्या दर्शनात' कदाचित बेहद्द आवडेलही.
-विचक्षण