वा मोरूभाऊ, एका माणसाला जीव देण्यापासून परावृत्त करणे हे मोठे कार्य आहे आणि ते देखील एका अर्थी समाजकार्यांतर्गत येते. समाजकार्य हे नुसते धन वा सेवा एव्हढेच मर्यादित नसते असे मला वाटते (कोणी म्हणेल ' हे कशावरून आणि असा आग्रह कां ' तर मला म्हणायचे आहे - मला माहित नाही). कुणाला दुःख झाले असलेल्या प्रसंगी त्या व्यक्तीचे खांद्यावर हात ठेऊन त्याचे सांत्वन करणे (नुसते कृतिने नव्हे त्याचे दुःख बघून आपल्या हृदयाला पीळ पडत असेल तर), कुणाच्या आनंदात निरागसपणे सहभागी होणे, कोणा नाउमेद झालेल्याला प्रोत्साहित करून त्याला आपल्यातील स्वशक्तीची जाण करून देणे इ. इ. अशा बऱ्याच गोष्टी समाज कार्याचा भाग आहे असे मला वाटते. मी हे सर्व कुठे वाचले नाही तेव्हां दाखले देऊं शकत नाही. आता मी स्वतः काय करतो ?
      महाराष्ट्रात सिरोंचा म्हणून एक आदिवासी भाग आहे. पावसाळी चार महिने तो इतर प्रांताशी cut-off झालेला असतो. तिथे आदिवासी लोकांच्या मुलांसाठी एक संस्थातर्फे एक आश्रमशाळा चालवली जाते. त्यातील एका मुलासाठी लागणारा वर्षभराचा खर्च मी उचलत असे. निवृत्त झाल्यावर एका संपर्काद्वारे हे चालले होते. गेले दोन वर्षे संपर्क नाही - आमचा सहभाग संपला. राजुरा नावाच्या ठिकाणी बदली निमित्त असतांना १५-२० किमि च्या परिसरांतील चार खेड्यांमध्ये जाऊन तिथे महिलांसाठी व प्रौढांसाठी आठवड्यातून दोन दिवस लिहिण्या वाचण्याचे शिक्षण वर्ग व त्यासाठी त्यांना पाट्या, वह्या वगैरे साहित्य पुरवणे. पैका जास्त लागत नसे पण वेळ देत होतो. आता विषय निघाला म्हणून त्या गोष्टींची आठवण झाली अथवा ते कार्य विसरलोच होतो. सगळेच काही वाचायला/लिहायला  शिकले  असे नव्हे, पण आपले नाव लिहिता येऊन सही करायला सर्वच शिकले. त्यात आणि सही करायच्या आधी कशावर सही करतोय हे निदान कुणाकडून वाचून तरी घ्यावे एवढी खबरदारी घ्यायला पाहिजे एवढे त्यांना ज्ञान झाले. आम्हाला मजाही आली आणि समाधान झाले. बस्स. खूप झाले स्व-पुराण. सध्या ठोस असे काही करत नाही पण काहीच करतही नाही असेही नाही. आजूबाजूला पाहिले तर करण्यासारखे खूप दिसते त्यात थोडा वाटा उचलतो.