मोरू साहेब,
ही चर्चा चालू केल्याबद्दल आभार..
या चर्चेला येणारे कमी प्रतिसाद पाहून असे वाटते की आपण फारच विनयशील असल्याने, उजव्या हाताने करत असलेले दान डाव्या हातालाही समजू नये या संस्कृतीतील आहोत असे वाटते... हे माझे वाक्य संपूर्ण उपहासाने घेऊ नका (जरी त्यात तसा तो थोडासा असला तरी!). मनोगतवर मी बऱ्याचदा या वरून ओरडा आरडा करत असलो तरी असे नक्कीच वाटते की प्रत्येक जण काहींना काही तरी समाजासाठी करत असतोच. प्रश्न एव्हढाच पडतो की आपण हातच राखून वागत असतो का? याचे मला अपेक्षित असलेले उत्तर शोधण्यासाठी मी आधी समाजकार्य या शब्दाचा माझा अर्थ सांगतोः
समाजकार्य म्हणजे, ज्या समाजाचा आपण अविभाज्य भाग आहोत तो समाज जर चांगला राहिला तर मी आणि माझे कुटुंब चांगले राहील हे समजून, जाणीवेने आणि यथाशक्ति समरस होऊन केलेले काहीही स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थाच्या बाहेर केलेले आणि इतरांना मदत होईल असे कार्य.
वरील व्याख्येमध्ये कुठलेही कार्य बसू शकते जरी प्रत्येकाची गरज, महत्त्व हे स्थलकालसापेक्ष राहील. उदाहरणार्थ एखादी गोष्ट ही भारतात असताना भारतीयांसाठी करणे आणि भारताबाहेर राहून भारतीयांसाठी करणे यात फरक असतो. असो... नमनाला घडा भर तेल लावण्यापेक्षा आधी माझा खारीचा वाटा काय आहे याची कल्पना देतो.. (संपूर्ण कल्पना डाव्या हातालाही नाही आणि आत्मप्रौढी करण्याचा उद्देश नाही...)
गेल्या पंधरा वर्षात मी अमेरिकेत असल्यापासून माझा अनेक कार्यांशी संबंध आला. स्वतःच्या संस्कृतीची कल्पना ही बाहेरच्या जगात राहिल्यावर येते असे वाटते (निदान माझ्याबाबतीत तरी असे झाले..) -
यातील काही गोष्टी या आवड म्हणून झाल्या काही कदाचित जबाबदारी वाटतात म्हणून झाल्या असतील - पण काही आपण फार काही मोठे करतो ह्या भावनेने खचितच नाही. श्रावणातील कहाण्यांमध्ये गणपतीच्या सुरवातीच्या कहाणीत म्हटले आहे की "...अठरा लाडू करावेत, सहा देवाला द्यावेत, सहा ब्राम्हणाला द्यावेत आणि सहाचे सह कुटुंबी भोजन करावे.." (यातला मथितार्थ समजा, नाहीतर उगाच काही तरी वाद चालू होईल!), त्यापद्धतीने वागायचा हा व्यावहारिक प्रयत्न आहे...