एक तर विनोबांनी असे म्हटले आहे, गीतेत असे सांगितले आहे (पर्यायाने श्रीकृष्णाने असे म्हणून ठेवले आहे) म्हणून ते सगळे प्रमाण असे मानण्याचे कारण नाही. (तसे ते न मानण्याचेही कारण नाही). त्यामुळे सदर लेखन तर्काच्या कसोटीवर घासून घेण्याचा प्रयत्न करू. 

धर्म शब्दाचा अर्थ हिंदू धर्म, मुसलमानी धर्म, ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही
मग धर्माचा अर्थ काय? मनुष्यधर्म असा व्यापक अर्थ असेल तर मग सर्व मनुष्यजातीचा धर्म एकच होतो. मग स्वधर्म, दुसऱ्याचा धर्म याचा अर्थ काय? आणि मग धर्म जन्मावर आधारित असतो किंबहुना तो जन्माच्याही आधीपासून ठरलेला असतो याला तरी आधार कसला? समजा तसे असेल तर दोन वेगवेगळया 'धर्मा'च्या आई-बापांच्या पोटी जन्मलेल्या बालकाचा धर्म कसा ठरवणार?
मोहामुळे धर्माच्या आचरणात अडथळे येण्याइतपत धर्म दुबळा असेल तर बहुसंख्यांना  धर्माचे आचरण करा असे सांगण्यात तरी काय हशील आहे? नुसत्या मोहत्यागाने किंवा विरक्तीची राख फासून धर्माचे पालन होते काय? जातीचा धर्माशी काही संबंध नसेल तर एका धर्मात जे मान्य किंबहुना धर्मपालन म्हणून सांगितले आहे ते दुसऱ्या धर्मात कडेकोट वर्ज्य आहे हे कसे? इस्लाम धर्मात कुर्बानी म्हणून केलेली पशुहत्त्या हिंदू धर्माला अमान्य आणि ख्रिस्ती धर्मात मान्य ते पवित्र मदिरा (वाईन) पान इस्लामच्या दृष्टीने निषिध्द हे कसे काय?
चिंतनाने आणि अनुभवाने धर्माचे स्वरूप बदलत जात असेल तर एखाद्याने आपल्या आचरणात बदल किंवा फरक केला तर त्याचे वर्तन धर्मबाह्य कसे काय होते?
जन्मप्राप्त, देशकालपरिस्थितीप्राप्त, निसर्गदत्त सद् वर्तन (कर्तव्यपालन) म्हणजेच स्वधर्म
असे जर असेल तर सद्वर्तन करणारे सगळे एका धर्मात आणि दुराचारी सगळे दुसऱ्या अशी अधिक सोयीस्कर विभागणी करता येईल की! मग त्यात धर्मांतर करण्याचा प्रश्नही येणार नाही.
झोपेतही शरीरास मुंगी चावली तर शरीर प्रतिक्षिप्त हालचाली आपोआप करते. शरीरातील जो भाग हे ज्ञान राखतो तो आत्मा
आम्ही त्याला मेंदू किंवा चेतासंस्था म्हणतो. तिचे अस्तित्व काही अमर या स्वरूपाचे नाही. मनुष्याचा मृत्यू झाला की ही संस्थाही मरण पावते. मग त्या अद्याप अस्तित्व सिद्ध न झालेल्या 'आत्मा' नामक अविनाशी कल्पनेचे स्वरूप काय व कसे आहे?
आत्मा ही एक संकल्पना लोकांना पापभीरू बनवून सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यास कारणीभूत झाली असावी असा माझा समज आहे.
आत्मा ही जर फक्त एक संकल्पनाच असेल तर मुंगी चावल्याचे ज्ञान तिला कसे होते?
आज जी भारतीय संस्कृती विकसित झालेली दिसते ती दिसली नसती.
आजची भारतीय संस्कृती म्हणजे काय? जिथे धर्माचे पालन होत नाही तिथली संस्कृती (?) भारतीय संस्कृतीपेक्षा कनिष्ठ मानावी काय?

यावर हे सगळेधर्मबुडवे नास्तीक विचार आहेत, मुळात श्रद्धाच नसेल तर त्याला यातले काय कळणार? 'आत्मा' वगैरे आंतरिक अनुभूतीचा भाग आहे असलेच स्पष्टीकरण येणार असेल तर कृपया तसदी घेऊ नये. पण मला तरी हा एक मोठा गोंधळ वाटतो.