तूप ओरपणारा - आणखी जास्त स्पष्टपणे म्हणायचे तर कोणत्याही वस्तूची आसक्ति असणारा - तो सात्त्विक अशी पुष्टी केलेली आपल्याला दिसली का ?

नाही. अध्यात्माविषयीच्या सखोल वाचनाअभावी* अशी पुष्टी कोणी केली असल्यास माझ्या नजरेतून सुटली खरी. परंतु तो मुद्दा नाही.

*तसाही अध्यात्मापेक्षा स्वतःवरून / स्वतःच्या अनुभवांवरून जग पारखण्याकडे माझा कल अधिक.

सत्त्वगुण किंवा तमोगुण हा तुपाचा अथवा उदाहरणादाखल विचाराधीन असलेल्या कोणत्याही वस्तूचा गुण नसून सेवन करणाऱ्याचा आहे, एवढाच मुद्दा मांडायचा आहे.

तूप ओरपणारा जर सात्त्विक नसेल/तामसी असेल, तर इथे सत्त्वगुणाचा अभाव/तमोगुण हा त्या व्यक्तीचा आहे, तुपाचा नव्हे. उलटपक्षी, तूप मर्यादित प्रमाणात सेवन करणारा जर सात्त्विक जीवन जगत असेल, तरीही तो सत्त्वगुण त्या व्यक्तीचाच ठरावा, तुपाचा नव्हे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर एखादा मनुष्य हा सात्त्विक आहे म्हणून तूप प्रमाणात खाईल. तूप (मग ते प्रमाणात असो वा प्रमाणाबाहेर) खातोय म्हणून तो सात्त्विक नव्हे. किंवा, तो मनुष्य सात्त्विक आहे, तूप सात्त्विक नव्हे.

थोडक्यात, तूप per se हे सत्त्वगुणी, तमोगुणी वगैरे काहीही नसावं.

शेवटी दिसून येणारा गुणधर्म हा सेवन करणाऱ्या मनुष्याचा असतो, मद्याचा नव्हे. मद्य हे by itself neutral असतं.
हा निष्कर्श आपल्या अनुभवाचा भाग असेल तर गोष्ट वेगळी. लोणी आणि मद्य हे neutral गुणधर्म असलेल्या वस्तू आहेत का ?

(स्वगत, प्रताधिकार‌उल्लंघनाबद्दल पु.लं.ची क्षमा मागून) आम्हाला कसला अनुभव आहे अन् कसला नाही, ही आमची प्रायव्हेट गोष्ट आहे, समजलेत?

(प्रकट) नाही हो, अध्यात्माप्रमाणेच याही विषयात 'तज्ज्ञ' म्हणवण्याइतका सखोल 'अनुभव' नाही. (असता तर इथे अध्यात्मावर तुमच्याशी वाद घालण्याऐवजी संध्येच्या काळी 'केशवाय नमः, नारायणाय नमः' म्हटल्यासारखी 'लेबलां'ची नामावली घोकत 'आचमनं' टाकत बसलो नसतो?) पण थोडीफार 'तोंडओळख' आहे, आणि ती अशी विधानं आत्मविश्वासासह करण्यासाठी पुरेशी आहे.

तूप काय किंवा मद्य काय, आपल्या आहारी असलं तर तो सत्त्वगुण, याउलट आपण त्याच्या आहारी असलो, तर तो तमोगुण, असा आपला साधा हिशेब आहे.

शेवटी आपलं स्वतःवर किती नियंत्रण असावं हा आपला गुणधर्म आहे, तुपाचा किंवा मद्याचा नव्हे.

मद्याबद्दलच बोलायचं झालं, तरी स्वतःवर नियंत्रण राखून, प्रमाणात राहून मद्याचं ("सत्त्वगुणी") सेवन करणं शक्य आहे. आता आपापली मर्यादा ओळखून ती न ओलांडणं हे आपल्या हातात आहे; जो ती राखतो, तो सत्त्वगुणी, जो ती ओलांडतो, तो तमोगुणी. मद्य हे या बाबतीत neutral आहे - मर्यादा राखणं - न राखणं हे आपल्या हातात आहे.

तसंच मद्याच्या अतिरेकी ("तमोगुणी" म्हणता येईल इतक्या) प्रभावाखालीसुद्धा वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं वागू शकतील - काहींना खूप गंमत करावीशी, बडबड करावीशी वाटेल, काही एकदम दुःखात गेल्यासारखे हमसाहमशी रडू शकतील, काही violent होतील, काही comaत गेल्यासारखे निपचित पडतील, तर काहींवर काहीही परिणाम होणार नाही. (तज्ज्ञ याबाबतीत सविस्तर खुलासा करतीलच.)  कोणतीही व्यक्ती मद्याच्या (अतिरेकी) प्रभावाखाली नेमकी कशी वागेल, ते पूर्णतः त्या व्यक्तीवर अवलंबून ("अवलंबून", mind you, "हातात" नव्हे!) आहे. या दृष्टीनंही मद्य हे neutralच म्हणावं लागेल.

आणि बहुतांशी लोकांचा असाच अनुभव आहे कां ?

बहुतांशी लोकांचा असा (म्हणजे "मद्य हे neutral असण्याचा" किंवा अगदी "मद्य आपल्या ताब्यात असण्याचा / आपण मद्याच्या आहारी नसल्याचा") अनुभव नसेल, तर बहुतांशी लोक हे तमोगुणी आहेत असं म्हणता येईल फार तर - त्याबद्दल मद्याला दोष का द्या? (किंवा for that matter तुपाला? तुपाचीही चटक लागू शकतेच की!)

याउलट बरेच लोक असेही असतील की त्यांना मद्याचा "असा" नव्हे, कसलाच अनुभव नसेल. (हा शेवटी ज्याचात्याचा प्रश्न आहे; त्याबद्दल आक्षेप नाही.) आता अशा लोकांनी प्रत्यक्ष अनुभवाअभावी (तुमच्या पुढच्या मुद्द्याप्रमाणे) जर केवळ गीतेत वाचून "मद्य हे तमोगुणी असतं" असा काही(बाही) निष्कर्ष काढला, तर तो मद्याचाच दोष म्हणावा का?

(या सर्व विवेचनामागे मद्यपान करण्याचं किंवा न करण्याचं, कसलंच समर्थन करण्याचा हेतू नाही. ज्याला तूप आवडतं, त्यानं तूप खावं, ज्याला मद्य आवडतं, त्यानं मद्य प्यावं; ज्याला फ्लॉवर-बटाटा रस्सा आवडतो, त्यानं फ्लॉवर-बटाटा रस्सा खावा; ज्याला मटणकरी आवडते, त्यानं मटणकरी खावी [किंवा पापलेट आवडणाऱ्यानं पापलेट किंवा रोस्ट बीफ सँडविच आवडणाऱ्यानं रोस्ट बीफ सँडविचसुद्धा खावं]; जे काय खायचं-प्यायचं ते प्रमाणात, स्वतःचा तोल न घालवता, स्वतःला किंवा दुसऱ्याला त्याचा त्रास न होऊ देता खावं-प्यावं, मात्र उगाचच स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या खाण्यापिण्याला 'सात्त्विक', 'तामसी' [किंवा 'ती घाण'] असली लेबलं लावू नयेत, एवढंच म्हणणं आहे. बाकी 'जो जे वांछील तो ते खाओ-पिओ'!)

आपल्याला खरोखरच जाणून घ्यायची ओढ असेल तर ह्यावर मी एवढेच म्हणेन की आपण कृपया गीता अध्याय १७ श्लोक ७,८,९ व त्यावरची commentary पहा. मला ज्ञानेश्वरी आवडते म्हणून मी ह्या श्लोकावरच्या त्यांच्या ओव्या पहाण्याचा आग्रह करीन. कारण त्या सगळ्याचा विस्तार इतका आहे की त्याला नुसता एक स्वतंत्र लेख नव्हे त्याचे २-३ भागही करावे लागतील. प्रतिसादातून हे सर्व देणे शक्य नाही.

मद्याबाबत जाणून घ्यायची ओढ (असली तर) ही गीता वाचून कशी तृप्त होऊ शकेल ते कळलं नाही. तसंही पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून** मिळालेलं ज्ञान हे कधीही श्रेष्ठच नव्हे काय?

(**यात स्वानुभव आणि परानुभूतीचं प्रत्यक्ष निरीक्षण दोन्ही - किंवा दोन्हींपैकी काहीही - येऊ शकतं.)