आर्थिक दृष्ट्या ब्राह्मण ही दरिद्रि जमात आहे. शारीरिक दृष्ट्या दुर्बल असल्यामुळे ही जमात लढाऊ नाही त्यामुळे या जमातीकडे राज्यसत्ताही नव्हती. असे असतांना हजारो वर्षे या जमातीचे समाजावर वर्चस्व कशामुळे राहिले?
या प्रश्नाचं उत्तर थोडं विस्ताराने देते. आर्यांची भटकी जमात ही वैदिक काळात राज्यापेक्षा लवाजम्यातील माणसांना महत्त्व देऊन होती. (जन वि. जनपद) कालांतराने गंगेच्या खोऱ्यात स्थायिक झाल्यावर, लहान मोठी गावे वसवल्यावर, राज्य, राज्यशासन, नियंत्रण, नीती इ. संकल्पना पुढे आल्या. वर्ण व्यवस्थेचा पाया तिथे रचला गेला आणि समाज राजा, शासक(rulers) आणि प्रजा, (ruled मराठी शब्द?) अशी विभागली गेली. एकदा राज्य रचना झाल्यावर तिचे पोषण, रक्षण आणि नियंत्रण यांची जबाबदारी ब्राह्मण आणि क्षत्रियांवर आली. राज्यकर्ते क्षत्रिय असले तर राज्य चालवणारे, कायदे करणारे, नियंत्रण ठेवणारे ब्राह्मणच होते. राज्यविस्तार, राज्यरक्षण यांची जबाबदारी क्षत्रियांवर असल्याने धर्म कांडाचा बागुलबुवा निर्माण करून, क्षत्रियांना हाताशी धरून त्यांच्या (उपस्थितीत आणि) अनुपस्थितीत राज्य सांभाळणारे ब्राहमणच खरे राज्यकर्ते होते.
अगदी रामायण- महाभारताची उदाहरणे घ्यायची झाली तरी विश्वामित्रांनी सांगितल्यावर यज्ञाचे रक्षण करणारे कुमार राम-लक्ष्मण आणि द्रोणाचार्यांच्या अपमानाचा सूड उगवणारे कुरू हे त्या त्या ब्राह्मणांचे बळ दाखवते. तेच चाणक्य आणि चंद्रगुप्ताच्या बाबत. भगवी वस्त्रे धारण केली आणि अंगावर भस्माचे पट्टे ओढले म्हणून कुणी दरिद्री होत नाही. (ते तर आमच्या पुट्टपर्थीचे सत्य साईबाबाही करतात.) आणि मद्याचे पेले रिचवले नाहीत किंवा जनानखान्यात बायका नाचवल्या नाहीत म्हणूनही कुणी दरिद्री होत नाही. (पेशवे ते ही करून पार होते म्हणे). आणि दारिद्र्याबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक जातीत, वर्णात, देशांत, समाजात गरीब आणि श्रीमंत आढळतातच.
दरिद्री ब्राह्मणांच्या गोष्टी रचवल्या गेल्या त्याचे कारण शंभरात कुणी वेगळा दिसला (हे माझे संख्याशास्त्र) तर त्याच्या वेगळेपणावरच गोष्ट तयार होते. दरिद्री असून सात्त्विक राहणी, किंवा परिस्थितीत बदल इ. वर एक सुरस कथा तयार होते. (रामशास्त्री प्रभुण्यांचा भिकबाळी किस्सा प्रसिद्धी पावतो पण त्या भीकबाळ्या वागवणारे ब्राह्मण दरिद्री कसे?) त्यापुढे जाऊन आपली थोरवी आपल्याच शब्दांत नमूद करायची झाली की पंचतंत्रातल्या दरिद्री ब्राह्मण कथा येतात. दरिद्री शूद्रांच्या गोष्टी कोण रचवणार हो? सगळेच दरिद्री त्यांच्यात वेगळे ते काय? शूद्रांची गोष्ट शंबुकाच्या नावे मात्र तयार होते.
असो. पुढचा इतिहास पाहायचा झाला तर धर्म, धर्मकांड, पूजा-अर्चा, देवाशी जवळीक, प्रायश्चित्त या अनेक थोतांडांचा वापर करून ब्राह्मणांनी सत्ता केंद्रित केली. विद्येची उपासना हे त्यामागचे एक अवास्तविक कारण आहे त्यापेक्षा वास्तविक कारण म्हणजे देव, धर्म, कर्म, बहिष्कार यांची भिती घालून समाजाला अंकित ठेवण्यात ब्राह्मण यशस्वी झाले. एकंदरीत राज्यकारभारात ब्राह्मणांचे वर्चस्व आणि ढवळाढवळ वाढल्यानेच जैन आणि बौद्ध धर्म क्षत्रियांत फोफावला व वृद्धींगत झाला हे अनेक कारणातले एक कारण दिसून येते. तत्कालीन बौद्ध धर्मीय फारसे शूद्र नसून बरेचसे क्षत्रिय राज्यकर्ते होते यातच काय ते समजावे. (कलिंगची लढाई लढणारा एक अशोक होता, बाकीचे त्यामार्गाने का चालले याचा विचार फारसा होत नाही. परंतु वर्ण व्यवस्था झुगारून ब्राह्मणी वर्चस्व कमी करण्याचा तो एक प्रयत्न होता.)
धर्मपीठावर बसून गरीब संन्याशाचा मुलांना छळणारेही ब्राह्मणच होते आणि ते खरंच गरीब होते का?
पुढचा बराचसा मोगली इतिहास टाळून शिवाजी राजांच्या काळात आले असताही ब्राह्मणांचे वर्चस्व दिसून येते. ते काय, दरिद्री पण विद्यावंत होते म्हणून की पूजा, धर्म मार्तंड होते म्हणून वर्चस्व टिकवून होते? दरिद्री असते, वर्चस्व राखून नसते तर त्यांच्यासमोर उभे राहून शिवाजी राजांना धर्म-चर्चा कराव्या न लागत्या. त्याही पुढे जाऊन राजांच्या अमात्य मंडळातील ब्राह्मणांची संख्या आणि राज्यकारभार पाहणाऱ्या इतर ब्राह्मणांची संख्या पाहता दरिद्री ब्राह्मणांच्या संख्येवर प्रश्नचिह्न लावावेसे वाटते. युद्धावर मरणारा कुठलातरी अनामिक शिलेदार आणि मृत पशूंची शरीरे खाऊन जगणारे महार त्याच्यापेक्षा श्रीमंत होते की काय?
पुढे पेशव्यांच्या हातात राज्यकारभार गेल्यावर ब्राह्मणांची परिस्थिती काय होती यावर लिहायचा मला आता कंटाळा आला आहे. तरी अनेक उदाहरणांवरून खरे राज्यकर्ते ब्राह्मणच होते हे दिसते.
इंग्रजांच्या काळात मात्र ब्राह्मणांचे वर्चस्व कमी झाले. त्यातून मंगल पांडे पासून दुसऱ्या बाजीरावा पर्यंत सर्वांनी येन केन प्रकारे आपला धर्म उचलून धरून आणि कर्मठ विचारांना कवटाळून राहिल्याने ब्रिटिशांच्या काळात मागासवर्गीयांचा स्तर थोडासा उंचावला, समाज जागृती, पाश्चात्य शिक्षण, समाजसुधारक यांनी समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व झुगारून दिले आणि कदाचित याचे पर्यवसान ब्राह्मण मोठ्या संख्येने दरिद्री होण्यात झाले.
मागासलेल्या ब्राह्मणेतरांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे.
आत्मपरीक्षणाची गरज सगळ्यांनाच असते तेंव्हा इतरांना फुकाच्या सूचना देऊ नयेत.