प्रतिसाद माहितीपूर्ण आणि सविस्तर आहे.
आपल्या प्रतिसादाशी संबंधित काही मुद्दे,
राज्यविस्तार, राज्यरक्षण यांची जबाबदारी क्षत्रियांवर असल्याने धर्म कांडाचा बागुलबुवा निर्माण करून, क्षत्रियांना हाताशी धरून त्यांच्या (उपस्थितीत आणि) अनुपस्थितीत राज्य सांभाळणारे ब्राहमणच खरे राज्यकर्ते होते.
तसे काही लोक होते खरे, पण ब्राह्मणांच्या एकूण संख्येच्या मानाने किती होते? त्याचकाळात हे काही न करता केवळ विद्याभ्यास/अध्ययन करणारेही ब्राह्मण होते.
अगदी रामायण- महाभारताची उदाहरणे घ्यायची झाली तरी विश्वामित्रांनी सांगितल्यावर यज्ञाचे रक्षण करणारे कुमार राम-लक्ष्मण आणि द्रोणाचार्यांच्या अपमानाचा सूड उगवणारे कुरू हे त्या त्या ब्राह्मणांचे बळ दाखवते. तेच चाणक्य आणि चंद्रगुप्ताच्या बाबत.
या उदाहरणात विश्वामित्रांनी फक्त यज्ञाच्या रक्षणाकरता रामलक्ष्मणांना बोलावले होते, याव्यतिरिक्त राज्यकारभारात त्यांनी ढवळाढवळ केल्याचा काही संदर्भ नाही. द्रोणाचार्यांनी स्वतःच्या इच्छेविरुद्ध बऱ्याच गोष्टी राजाची आज्ञा म्हणून केल्याची/सहन केल्याची उदाहरणे आहेत. चाणक्य केवळ ब्राह्मण आहे म्हणून चंद्रगुप्ताने त्याचे ऐकले नसावे. (तसे असते तर नंद राजानेही ऐकायला हवे होते.) चाणक्य आणि चंद्रगुप्त यांच्या मोठेपणात त्यांच्या जातीपेक्षा अंगभूत गुणावगुणांचा भाग अधिक आहे असे वाटते.
दरिद्री ब्राह्मणांच्या गोष्टी रचवल्या गेल्या त्याचे कारण शंभरात कुणी वेगळा दिसला (हे माझे संख्याशास्त्र) तर त्याच्या वेगळेपणावरच गोष्ट तयार होते. दरिद्री असून सात्त्विक राहणी, किंवा परिस्थितीत बदल इ. वर एक सुरस कथा तयार होते.
दरिद्री असण्याचे मूळ अर्थप्राप्तीचे कोणतेही साधन न असण्यामध्ये आहे असे वाटते. त्यांनी अर्थार्जनासाठी काही न करता (शेती/व्यापार इ.), इतर लोकांच्या साहाय्यावर जगणे अपेक्षित होते. त्यामुळे बहुसंख्य ब्राह्मण दरिद्री असणे शक्य असावे. त्यामुळे ही केवळ सुरस कथा/कवितांमधील कल्पना होती असे म्हणता येणार नाही.
विद्येची उपासना हे त्यामागचे एक अवास्तविक कारण आहे त्यापेक्षा वास्तविक कारण म्हणजे देव, धर्म, कर्म, बहिष्कार यांची भिती घालून समाजाला अंकित ठेवण्यात ब्राह्मण यशस्वी झाले.
हे बऱ्याच अंशी खरे आहे. बऱ्याच अंशी यासाठी की अशी सत्ता सर्व ब्राह्मणांच्या नाही तर काही ब्राह्मणांच्या हातात होती. ह्याचा त्रास ब्राह्मणेतरांना झालाच पण ब्राह्मणांनाही झाला, ज्ञानेश्वरांचे उदाहरण प्रातिनिधिक आहे.
सांगण्याचा मुद्दा हाच की काही ब्राह्मणांच्या हातात अप्रत्यक्षपणे सत्ता होती, काही ब्राह्मण दरिद्री नव्हते, काहींनी देवधर्माच्या नावावर अन्याय्य प्रस्थ माजवले होते हे सगळे जरी खरे असले तरी सगळेच ब्राह्मण तसे होते असे म्हणता येणार नाही. याचे सामान्यीकरण (जनरायलेझन) करणे चुकीचे ठरेल असे वाटते. (याच न्यायाने, काही चांगली उदाहरणे घेऊन अति-उदात्तीकरण करणेही चुकीचे आहे.)
आत्मपरीक्षणाची गरज सर्वांना (ब्राह्मण असण्याचा अवास्तव अभिमान असणाऱ्यांना, सरसकट सर्व ब्राह्मणांवर केवळ टीकाच करणाऱ्यांना आणि यापैकी कोणतीही टोकाची भूमिका न घेणाऱ्यांनाही) आहे असे वाटते.