अमेरिकेत राहून प्रियालीताई विविध विषयांवरील इतकी छान माहिती गोळा करतात आणि मराठीमध्ये आमच्यासारख्या मनोगतींना ती सुलभपणे उपलब्द्ध करून देतात याबद्दल धन्यवाद. लेख खूपच अभ्यासपूर्ण लिहिलेला आहे आणि सचित्र असल्यामुळे वाचायला मजा येते.
वाचता वाचता मनात आलेली एक छोटीशी शंका विचारीत आहे. वसाहत म्हणजे वस्ती असा एक रूढ अर्थ आहे तसेच कॉलनी या अर्थाने सुद्धा तो वापरला जातो. त्यातील कुठला अर्थ मथळ्यामध्ये अभिप्रेत आहे?
"कंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)" या मथळ्यावरून कोणे एके काळी भारत नावाची एकछत्र महासत्ता होती आणि तिच्या आजूबाजूला तिची मांडलिक राष्ट्रे होती की काय असा एक विचार मनात येतो. माझ्या अल्प माहितीप्रमाणे अनेक शतके तत्कालिन हिन्दू संस्कृतीचा प्रभाव दूरवर पसरलेला होता. याच्या एंगकोरवटसारख्या अनेक ठळक खुणा उपलब्ध आहेत. परंतु तेथील राज्यकर्ते किंवा जनता कधी भारतामधील राजाच्या अंमलाखाली होती कां? सध्या तरी कांबोडियासारख्या देशात प्रामुख्याने मंगोलवंशीय लोक राहतात. प्राचीन काळात कधी भारतीय आर्य किंवा द्रविड लोकांनी मोठ्या संख्येने तिकडे जाऊन वस्ती केली होती कां?