नमस्कार,
जेव्हा वर्णमाला ही तिच्यातील नैसर्गिक सौंदर्य आणि तार्किक सुसंगती विचारात न घेता पाढ्यांप्रमाणे घोकून घेतली ज़ाते (आणि त्या आधी एका पिढीला गमभन, एका पिढीला अबकड, एका पिढीला वबक अशा प्रकारे वर्णांची ओळख करून दिली जाते) तेव्हा क्रमाने वर्णमाला न सांगता येण्यात विशेष काहीच नाही! पाढे किती लोकांना तोंडपाठ येतात?
आणि श व ष हे उदाहरण आता आपण द्यावे का हे ठरवायची वेळ आली आहे. उच्चारानुसारिणी देवनागरी लिपीतली ही दोन्ही व्यंजने निश्चितच निराळा उच्चार असलेली आहेत. (हेच जर्मन शिकताना 'soft' sh and 'hard' sh असे सांगितले की ते ज़मावे यासाठी लोक जीभ वळवून वळवून प्रयत्न करतात!)
आमच्या पिढीला शिकवण्यार्या शिक्षकांनी आम्हाला श आणि ष यांतील फरक कधीही उच्चारांनी शिकवला नाही, तर 'शहामृग श' आणि 'पोटफोड्या ष' असा शिकवला! ज़र असा केवळ लिखाणात फरक असेल, तर मग एकाच उच्चारासाठी दोन निराळी चिन्हे देवनागरीत का असावीत असा प्रश्न कुणाला तेव्हा पडला नाही का? अगदी शिक्षक सोडले, तर अन्य लोकांनीही कधी हा फरक शिकवला नाही. मला स्वतःला ष या अक्षराचा, आणि म्हणून मग क्ष या अक्षराचाही उच्चार बरोबर समज़ण्यासाठी व ज़मण्यासाठी वयाची १५ वर्षे ज़ावी लागली! मग त्यानंतर मात्र हे असे शहामृग आणि षट्कोन असे लक्षात ठेवावे लागले नाही!
(हे उच्चार समज़ायचे असतील तर सुधीर किंवा श्रीधर फडकेंची गाणी ऐकणे हा सर्वांत चांगला मार्ग!)
पण ज्यांच्या डोक्यांत या अक्षरांमधला भेद कृत्रिमरीत्या भरला आहे, त्यांचा ती लिहिताना गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.
ज़र आपण या अक्षरांचा निराळा उच्चार करणार नसू, तर मग ती आपल्या लिपीत ठेवायची तरी कशाला? ज़शा प्रकारे अनुच्चारित अनुनासिके (जी खरे तर उपयुक्त होती, परंतु बहुतांश लोकांना उच्चारता येत नव्हती) आपण काढून टाकली, तशाच प्रकारे श व ष यांपैकी एक अक्षर काढून टाकू!
आणि हेच अन्य शुद्धलेखनालाही लागू आहे! मुहूर्त हा शब्द बरोबर लिहायचा असेल, तर त्याचा बरोबर उच्चार मनात पक्का हवा. अगदी इतके अवघड शब्द घेतले नाहीत, तरी 'प्रिय', 'शरीर' अशा साध्या साध्या शब्दांतही तसे शिकवले गेलेले असले पाहिजे, कानांवर तसेच पडले पाहिजे, तरच शुद्धलेखन ज़मणार! दुसरा, तिसरा हे मराठी शब्द म्हणजे हिंदीतील दूसरा, तीसरा नव्हेत हे ज़ाणले पाहिजे! मराठीतील बहुतांश सर्व शब्द दीर्घान्त आहेत हे ध्यानात असले पाहिजे. पण जेव्हा शब्दाचे लेखन आणि उच्चार यांतला संबन्ध हा सुसंगत आहे हेच समज़ावले गेलेले नसते, तेव्हा कुणी अशा चुका नेमाने केल्या तर त्यात आश्चर्यजनक काहीही नाही!
मराठा