कृपया "माझी" मदत म्हणत वा लिहीत जाऊ नका. हे हिन्दी मराठी झाले. मराठीत "मला" मदत म्हटले जाते. कृपया राग मानू नका, पण अशाने मराठी विकृत होत चालली आहे म्हणून आपणच हे पाळले पाहिजे.

मराठीत क्रियापदांचे तीन प्रकार आहेत. सकर्मक, अकर्मक आणि संयुक्त.

पैकी सकर्मक म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या वाक्यांचे अर्थ पूर्ण होण्यासाठी, अधिक कळण्यासाठी कर्माची गरज असते, ती क्रियापदे. उदा. वाचणे, लिहिणे, पाहणे इ.

म्हणजे "मी वाचले." यापेक्षा "मी पुस्तक वाचले." ही अधिक सार्थ आहे.

अकर्मक क्रियापदे म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या वाक्यांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते, अशी क्रियापदे. उदा. बसणे, उडणे, धावणे इ.

म्हणजे "पक्षी उडाला" हे अर्थपूर्ण वाक्य आहे.

संयुक्त क्रियापदात दोन क्रियापदे असतात. पैकी एकाचे धातुसाधित रूप असते.

उदा. "तो वाचत बसला." यात वाचणे आणि बसणे अशी दोन क्रियापदे असली तरी एकाच कृतीचा बोध होतो. म्हणून येथे "वाचत बसला" हे संयुक्त क्रियापद होय.

यात तुम्हाला हवे ते उत्तर नसेल कदाचित, पण ह्याचा शिकविताना नक्कीच उपयोग होईल असे वाटते.