धर्म ह्या शब्दाचा अर्थ नक्की कसा घ्यावा ते तुमचं तुम्ही ठरवा.
मी काही उदाहरणं देतो.
शरीरधर्म - भूक लागणे, शरीरातून विविध पदार्थांचे उत्सर्जन होणे इ. हा शरीरधर्म.
गुणधर्म - सखल भागाकडे वाहणे हा पाण्याचा गुणधर्म आहे. लोखंडाला आकर्षून घेणे हा चुंबकाचा गुणधर्म आहे. पाण्यावर तरंगणे हा लाकडाचा गुणधर्म आहे.
रंगधर्म - उत्तेजना देणे हा तांबड्याचा रंगधर्म आहे. शीतलता देणे हा निळ्याचा रंगधर्म आहे. प्रसन्नता देणे हा हिरव्याचा रंगधर्म आहे.
त्याच धर्तीवर असे म्हणता येते की, इतर पशू मारुन खाणे हा सिंहाचा धर्म आहे. दूध देणे हा गायीचा धर्म आहे.
परोपकार करणे हा सदूचा धर्म आहे (परोपकारी सदू :))
इत्यादी....
तर लोकहो, मी काही ज्ञानी, उपासक, तत्त्ववेत्ता नाही (आधुनिक/आध्यत्मिक दोन्हीही). पण या आणि अशा तुम्हाला माहित असलेल्या उदाहरणांद्वारेच धर्माचा अर्थ शोधतो आहे.
इंग्रजीतील Religion ह्या शब्दास खरेतर संस्कृत/प्राकृत मधे चपखल शब्द नाही.
इस्लामचे जसे कुराण आहे, ख्रिश्चनांचे जसे बायबल आहे, शीखांचे गुरूग्रंथसाहिब आहे तसे हिंदूंचे कुठलेही Code Book नाही. हिंदू धर्माची कोणी स्थापना केल्याचे ऐकिवात नाही.
परंतु 'मनुष्याने' (हिंदूने नव्हे!) कसे वागावे याचे मार्गदर्शन मात्र अनेक ग्रंथ, पोथ्या, पुराणं, वेद, उपनिषदं इ. रचनांमधून केलेले आहे. गीता, महाभारत, रामायण ह्या अशाच मान्यता पावलेल्या रचना म्हणता येतील.
'जगात प्रचलित असलेल्या अर्थाने हिंदू हा धर्म नाही तर हिंदू ही एक संस्कृती आहे' हे न्यायालयामधे झालेल्या खटल्यांमधे न्यायालयाने मान्य केले आहे (हे वृत्तपत्रामधे वाचल्याचे आठवते).
जुन्या संस्कृत लेखनातील धर्म या शब्दाचा अर्थ; लक्षण (शरीरधर्म), आचरण (सिंह/गाय), नियम (चुंबक), आचरण पद्धती (सदू) या संदर्भाने घेतला जातो.
'मनुष्यधर्म' हा अखिल मानवजातीचा एक धर्म (Religion) या अर्थाने नसून, इतर प्राणीजातींचा जसा आपला आपला वागण्याचा धर्म आहे, तसा मनुष्याने वागण्याचा धर्म या अर्थाने प्रेरित आहे.
'अहिंसा परमोधर्मः' यात अहिंसा नावाचा कुठला धर्म नसून ते आचरण आहे अहिंसेच्या तत्त्वाचे. ती विचारपद्धती आहे.
रडणे हा बालकाचा धर्म आहे. पण तरूण वयात तो रडणे सोडून देईल. त्यामुळे त्याचा धर्म (आचरण पद्धती/वृत्ती) बदलत जातो.
धर्म, अर्थ, काम, मोक्ष - यात धर्म हा प्रजेचे संरक्षण करणे हा राजाचा धर्म; पत्नीचा सन्मान राखणे, मुलांचे संगोपन करणे हा गृहस्थाचा धर्म या अर्थाने (कर्तव्य/जबाबदारी) आहे.
मी 'स्वधर्म/परधर्म' ही चर्चा अजून वाचलेली नाही. गोळ्यांनी वर लिहिलेला लेख देखिल माझ्या डोक्यात नीटसा शिरला नाही. पण धर्म या शब्दावर विनाकारण घातलेला घोळ पटला नाही. धर्म = Religion, हा संकुचित अर्थ सोडल्यास (जो अस्तित्वातच नव्हता!) आपल्या संस्कृतीचे आणि तत्त्वज्ञानाचे आकलन जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. प्रत्येकवेळी दुसऱ्याच्या बोळ्याने दूध पिणे (पाश्चात्य तत्त्वज्ञानाने) हितकारक नसते.