मानसशास्त्रानुसार समाजात 'अ' आणि 'ब' प्रकारची व्यक्तिमत्वे असतात. 'अ' प्रकारचे लोक आक्रमक, धाडसी व पटकन निर्णय घेण्याचे क्षमता असणारे तर 'ब' प्रकारचे लोक हे शांत, मवाळ व निर्णयक्षमता नसलेले असतात. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे समाजात असणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मी स्वतः 'अ' प्रकारात मोडतो. या प्रकारात असण्याचे फायदे जरूर आहेत, पण तितकेच तोटेही आहेत. 'अ' प्रकारचे लोक हे सतत अस्वस्थ आणि नाविन्याच्या शोधात असतात. त्यांना एखाद्या गोष्टीचा पटकन कंटाळा येतो.त्यांचा स्वभाव उतावळा आणि शीघ्रकोपी असतो. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान याचा विचार केला तर 'ब' प्रकारचे असणे अधिक फायद्याचे आहे. अर्थात माझे हे मत 'दुसऱ्याची पत्नी अधिक सुंदर असते' या प्रकारचे असण्याचीही शक्यता आहे.
ज्याचे त्याचे व्यक्तिमत्व जन्मतः ठरलेले असते. त्यात विकास करण्याचा जरूर प्रयत्न करावा, पण मारूनमुटकून ते बदलण्याचा प्रयत्न करू नये. बहुदा तसे करणे शक्यही नसते.