आणखी काही असेच अकलेचे तारेः
रामायणकाळात विमाने अस्तित्वात होती. (पुरावाः रावणाचे पुष्पक विमान).
आणखी एक षटकार आय आय एम (अहमदाबाद) च्या प्रां. चा. त्या पुष्पक विमानातून अनेक जणांसह राम अयोध्येस आला असे म्हणतात. मग इतके सगळे लोक त्या विमानात कसे बसले? कारण त्याकाळी माणसे 'झिप' (संगणकावरील अनेक फाईल एकत्र करण्याचे तंत्र) करण्याचे तंत्र रामाला अवगत होते. (मी लगेच त्यांना सा. न. घातला.)
हा अतिरेकाचा आणि तर्कटपणाचा भाग सोडून द्या. पण आपला मुद्दा अगदी वाजवी आहे. जरी असे होते हे खरे मानले (वादापुरते) तरी देखील साधारणपणे एखाद्या शोधाचे श्रेय त्याला (वा तिला) जाते जो ते तत्व वा शोध अधिक सरल नेमक्या आणि -कदाचित- उपयुक्त पद्धतीने मांडतो. (कदाचित याच कारणाने रेडिओचा शोध जगदीशचंद्रांऐवजी मार्कोनीच्या नावे झाला असेल.) अनेकांनी एखादे निरीक्षण केले असेल म्हणून त्यामागचे तत्व त्यांनी शोधले असे नाही. विचार, मीमांसा वा मांडणी ही सुद्धा श्रेयासाठी आवश्यक आहे.
हल्ली अनेक नव्या गोष्टी आपल्या परंपरेत आधीच होत्या म्हणणारी एक जमातच तयार झाली आहे. वेडेवाकडे तर्क करून असले मुद्दे सिद्ध करणे हा एक धंदा झाला आहे. मी अशांना फक्त एकच प्रश्न विचारतो, की जर हे सगळे आपल्याकडे आधीच होते तर मग आपण त्याचे मूल्य जाणून संगोपन /संवर्धन का केले नाही? निदान तेवढे करंटेपण तरी आपले नाही का? आपल्या संस्कृती वा परंपरेमध्ये अनेक अभिमानास्पद गोष्टी असताना असे बादरायण संबंध जोडून हास्यास्पद तर्क का करावे हे मला कधीच समजलेले नाही.
गंमत म्हणजे अशा दाव्यांमध्ये खऱ्या खोट्याचे बेमालून मिश्रण केले जाते जेणेकरून तुम्ही त्यातील एकाशी सहमत झालात की लगेच तुम्ही इतर मुद्द्यांशी सहमत झाला असा दावा करता येतो. तुम्ही वर उल्लेख केलेले मग आर्यभट, भास्कराचार्य, ज्ञानेश्वर वगैरे खरोखर आपल्या अभिमानाची स्थाने आहेत, पण लगेच रामनामाने दगड तरले वगैरे काल्पनिक गोष्टी जोडून ओघाचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतेकांना या दोन्हीमध्ये फरक करण्याइतकी विचारक्षमताही नसते. एकदा अभिमान बाळगायचा ठरले की मग आम्ही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. नुसती तुम्ही यादी करा, आम्ही लगेच दणादण अभिमानाची मोहोर उठवून देतो. असेच अनेक मुद्दे मला मनोगतावरही वाचायला मिळाले आहेत आणि मी फरक दाखवून देताना अतिशय उद्धट प्रतिसादांचा सामनाही केला आहे.
असो.
-विचक्षण