नामदेवराव यांनी सुरू केलेली चर्चा ही गांधीवाद हा आता कालबाह्य झाला का या विषयावर होती. गांधीवाद हा सर्व समस्यांवर "अक्सीर ईलाज" आहे का या विषयावर नव्हती असे मी मानतो. साहजिकच, मी दिलेली उदाहरणे ही गांधीवाद आजही काही समस्यांवर उपाय असू शकतो असे दर्शविण्यासाठी होती. किंबहुना कोणताच "वाद" हा सर्व समस्यांवर उपाय आहे असे मी मानीत नाही.
येथे चर्चिल्या गेलेल्या समस्या ह्या मुख्यत्वे दोन प्रकारच्या होत्या - १) राजकीय आणि २) कायदा-सुव्यवस्थेशी निगडित.
पैकी, कायदा-सुव्यवस्थेशी निगडित समस्या ह्या "नाठाळाचे माथी.." ह्याच न्यायाने सोडविल्या पाहिजेत. परंतु राजकीय समस्यांना मात्र चर्चा आणि देवाण-घेवाण याविना पर्याय नाही.
पंजाबची समस्या ही कायदा-सुव्यवस्थेची होती कारण सर्वसामान्य शीख माणसाचा वेगळ्या खलिस्तानाला पाठिंबा नव्हताच. काश्मीरची समस्या मात्र राजकीय आहे. अन्यथा जम्मू-काश्मीरमध्ये स्थित आपल्या ७ लाख लष्करी-निमलष्करी दलाला गिल-रिबेरोसारखे यश का येऊ नये ? त्यामुळे ती समस्या ही चर्चा-वाटाघाटींनीच सुटेल अन्यथा नाही. हीच गोष्ट इस्त्रायल-पॅलेस्टीन वादाची.
जाता जाता - हत्या झालेल्या निरपराध व्यक्तीचा धर्म काढू नये. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये फक्त हिंदूंचीच हत्या होते असा काहीसा गैरसमज येथे दिसतो. त्या राज्यात गेल्या बारा वर्षात सुमारे साठ हजार नागरिक मारले गेले. त्यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. हिंदू फारच कमी.