कान्देराव, टगेराव व विचक्षण यांचे लिखाण उत्तम आहेच पण मी थोडेसे वेगळे व तांत्रिक अंगाने लिहू इच्छितो.
आर्किमिडीज़ने नक्की काय शोधले व त्याचे ते तत्त्व कसे येते हे लहानपणी रहस्यमय वाटत असे. मोठेपणी त्या तंत्रशाखेत काम करण्याचा प्रसंग आला तेव्हा ते समजून घेऊन त्यावर विचार केला गेला. मला समजलेले निष्कर्ष याप्रमाणे (अर्थात हा सर्व माझा अन्वय आहे, चूक मिळाल्यास सुधारावी) -
१. आर्किमिडीज़ला हे कळले की वस्तूचा जेवढा भाग पाण्यात बुडतो तेवढे पाणी दूर सारले जाते. याचा उपयोग करून त्याने मुकुटाचे घनफळ काढण्याचे जुगाड केले. मग नेहमीप्रमाणे वजन करून घनता काढता आली व सोनाराची चोरी उघडकीला आणता आली. यात उद्धरणाच्या तत्वाचा काही संबंध नाही.
हुषार कावळ्याची गोष्टही लहानपणी शास्त्रीय दृष्टीने समजली नव्हती, त्यातही नेमके हेच आर्किमिडीज़चे तत्त्व आहे हे लक्षात आल्यावर खुलास झाला.
२. उद्धरण तत्त्वाचा शोध नक्की त्यानेच लावला किंवा कसे याचा निश्चित पुरावा मला मिळाला नाही. बरे, हे उद्धरण कोणत्या रहस्यमय शक्तीमुळे होते? तर रहस्य काही नाही, त्यात आवश्यक तत्त्व एवढेच आहे की द्रवाचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो. हे व पाणी आणि ती वस्तू यांच्यातील घनतेचा फरक विचारात घेतला की साध्या गणिताने उद्धरणाचा परिणाम का व किती होतो हे डिराइव्ह करता येते.
पण एकूण पहाता उद्धरणतत्त्व, तरंगण्याची/बुडण्याची तत्त्वे, तरंगण्याचे स्थैर्य व समतोलता यांच्याशी संबंधित शास्त्रशाखेचा विकास आर्किमिडीज़च्या नावे लागायला हरकत नाही.
विषयांतर झाले खरे, त्याबद्दल क्षमस्व. बरीच शास्त्रे आपल्याला वापरता येतात पण त्याच्या मूलतत्वांची समज मनात तेवढी स्पष्ट नसते. म्हणून एखाद्या वेळी ही तत्वे समजल्यासारखी वाटली की ते सांगावेसे वाटते.
दिगम्भा