सविस्तर प्रतिसाद लिहून मला प्रतिप्रतिसाद लिहायची प्रेरणा दिली याबद्दल दिगम्भा यांना धन्यवाद. मी सुद्धा कुठलाही मूळ पुरावा पाहिलेला नाही. पण एखाद्या सिद्धांताला तो सांगणाऱ्याचे नांव जोडण्याची जी पाश्चात्य परंपरा आहे त्याबर विसंबून आर्किमिडीज प्रिन्सिपल त्यानेच आधी मांडले असावे असे म्हणायचे.

आधी मलासुध्दा साधारण  दिगम्भा यांच्यासारखेच वाटले होते व अप्रत्यक्षपणे तसा उल्लेख मी केला आहे. "पाण्याच्या टबात उतरल्याबरोबर त्याला पाण्याच्या उध्दरणशक्तीची जाणीव झाली व त्याचा उपयोग सोन्याची घनता मोजण्यासाठी करता येईल ही नामी कल्पना सुचली." असे मी लिहिले आहे.

पण घनफळ काढून झाल्यावर घनता काढणे वगैरे आकडेमोडीचा भाग लोकांना समजावून सांगणे त्या काळात कदाचित गैरसोयीचे असेल.  त्यापेक्षा मुकुटाएवढ्याच वजनाची सोन्याची लगड घेऊन दोन्ही गोष्टींचे पाण्यात बुडवून वजन करणे हा पूर्णपणे प्रात्यक्षिक मार्ग त्याला दरबारात पेश करण्याच्या दृष्टीने परिणामकारक वाटला असणार.

उद्धरण कशामुळे होते हे अर्थातच आर्किमिडीजला माहीत नव्हते. जवळ जवळ दीडदोन हजार वर्षानंतर पास्कलने द्रवपदार्थामधील सम दाबाबद्दलचे तत्व सांगितले आणि त्याच्यानंतर आलेल्या न्यूटनने याला लागणारे बल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळते हे दाखवले.

गुरुत्वाकर्षणाचे बल किती असते ते न्यूटनने शोधून काढले पण ते कशामुळे होते ते नाही. विज्ञानाचा प्रवास असाच हळू हळू पुढे जात असतो.