उपरोल्लेखित लेख वाचल्यावर कोकणी ही पूर्वीपासून स्वतंत्र भाषा होती एवढे एकच विधान शिलालेखाच्या पुराव्यावरून मान्य होण्यासारखे आहे. बाकी ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरी कोकणीत लिहिली हे म्हणणे ज्ञानेश्वरानीच स्वतः माझा माराठाचि बोल म्हणून खोडून काढले आहे.महाराष्ट्रात आलेल्या कोकणी भाषकाना त्यांच्या भाषेतच रचना करून भाषाभिवृद्धी करण्यास तत्कालीन मराठी भाषकानी अडथळा आणला असे श्री.कामतही म्हणत नाहीत तेव्हा त्यानी स्वतःच मराठीचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता हे उघडच आहे. अगदी अलीकडे श्री.काका कालेलकर आणि कवि बा.भ.बोरकर यानी कोकणी स्वतंत्र भाषा आहे असा मुद्दा मांडला तरी त्यानी स्वतः मात्र जास्तीत जास्त लिखाण मराठीतच केले.कर्नाटकात कोकणीला उत्तेजन मिळाले असे कुठे दिसत नाही आणि तसे  असेल तर श्री. कामत कोकणीसाठी कानडी लिपीऐवजी नागरी (देवनागरी)लिपीचाच आग्रह का धरतात ? मराठी भाषकानी कोकणीला स्वतंत्र भाषा मानले नाही तरी तिचा दुःस्वास तरी मुळीच केला नाही हे मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी भाषेतील नाटकाना मिळालेल्या प्रतिसादावरून सिद्ध होते. आता गोव्यात कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळालाच आहे त्यामुळे मराठी भाषकांच्या मताचा त्यावर परिणाम होण्याची शक्यताही नाही,त्यामुळे कोकणी विरुद्ध मराठी असा वाद करण्यात अर्थ नाही,मात्र गोवा मुक्तिसंग्रामात मराठी भाषकानी आपल्या जिवाची बाजी लावली होती हे श्री.कामत यानी विसरू नये.
(भाषाप्रेमी)कुशाग्र