लेख मस्त जमून आलाय. त्या निमित्ताने आपल्याकडेही थोड्याफार फरकाने (किंवा अज्जिबात फरक नाही) हेच चालते असे वाटते. बाहेरून आलेल्या माणसाला बहुधा ते अधिक जाणवत असेल.
गेल्यावर्षी मी मुंबईला आले तेंव्हा भाजीवाला, रिक्शावाला, पानवाला, हॉटेल मधले वेटर सगळेच हातात भ्रमणध्वनी घेऊन फिरताना पाहिले. नमूद करावसं वाटतं की हे वेड मी अमेरिकेत त्यामानाने कमी पाहिले आहे. लोक बोलताना आडोशाला जाऊन बोलतात. अचानक फेफरं आल्यासारखं बरळायला लागले हे थोडं कमीच दिसतं. (अर्थात याला मिड-वेस्टची मर्यादीत लोकसंख्या हे ही कारण असू शकेल.)
एक मजेदार उदाहरण म्हणजे, मुंबईला मी रस्त्यातून जात असताना समोरुन भर गर्दीतून एक तरून मुलगी हातवारे करत, खिदळत, मोठमोठ्याने बडबडत जाताना मी पाहिली. क्षणभर मला वाटलं की पोरीच्या डोक्यात काहीतरी गडबड आहे. मग वाटलं बऱ्या वेशभूषेत दिसत्ये तेव्हा असा काही प्रकार नसावा. निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की ताई "मोकळेहात" वापरून कुणाशी तरी गप्पा मारत होत्या.
दुसरा अनुभव असा की मला ICICI मधून काही कागदपत्रे ताब्यात घ्यायची होती. त्यांच्याकडे ती तयार नव्हती. म्हणून त्यांनी मला सांगितलं की तयार होतील पण थोडे दिवस लागतील तुमचा दूरध्वनी द्या, फोन वरून कळावू. मी घरचा नं. दिला तसा हा नको भ्रमणध्वनी क्र. द्या म्हणायला लागले. मी सांगितलं की माझ्याकडे भ्रमणध्वनी नाही. त्याबरोबर काउंटर वरचे गृहस्थ ही बाई कुठल्यातरी जंगलातून आली आहे की काय अशा नजरेने माझ्याकडे बघू लागले.