विकिकर,

तुम्ही एका नाजूक विषयाला (माझ्या दृष्टीने) हात घातला आहे. कामत यांचा हा लेख मी ५-६ वर्षांपूर्वी महाजालावरच वाचला होता. तेव्हा त्याची दखल घ्यावीशी वाटली नव्ह्ती. तशी ती आजही वाटत नाहीच पण तुम्ही आता मनोगतावर हा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणून माझे मत मांडतो.

कोंकणी भाषकांत (विषेशतः गोमंतकीयांत) या विषयावर दोन तट पडलेले दिसतात. तेथिल बहुजन समाज हा कोंकणी भाषिकच असला तरी स्वतःस मराठीवादी (क्वचित मराठीदेखिल) मानतो. तुम्ही जर पेडणे, डिचोली, सत्तरी वगैरे भागात फेरफटका मारलात तर हे जाणवेल. मुखमंत्री प्रतापसिंह राणे यांनी ह्या स्वातंत्रदिनी जनतेला उद्देशून केलेले भाषण मराठीतच केले. या उलट तेथिल अभिजन समाज (आणि अल्पसंख्य किरीस्तांव समाज) ह्यांच्या कोंकणीप्रेमाला मराठीद्वेषाची झालर आहे. काही अपवाद आहेत नाही असे नाही पण ते फारच कमी.

हा लेख लिहिणारे श्री कामत हे कोणी भाषातज्ज्ञ असल्याचे ऐकीवात नाही. तेव्हा ते वरीलपैकी दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करतात हे उघड आहे.

कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे असे माझे मत आहे. तीची नाळ "महाराष्ट्री" पेक्षा "शौरसेने" शी अधिक जुळते. साहित्य अकादमीनेही कोंकणीला स्वतंत्र भाषा म्हणून प्रथम मान्यता दिली (नंतर भारतीय घटनेने). बोरकर, सुभाष भेंडे यांसारखे लेखक मराठी आणि कोंकणी या दोन्ही भाषांत समर्थपणे लेखन करीत होते/आहेत. तेव्हा कोंकणी भाषकांनी मराठीचा द्वेष न करता कोंकणीवर प्रेम केले तर ते अधिक समंजसपणाचे ठरेल असे वाटते.