१. मी मनोगतास तसा नवीन आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे  'शोध'  घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जुन्या चर्चा मला सापडल्या नाहीत यात मला चूक वाटत नाही किंवा माझे 'दुर्दैव' मानीन (काहीजण म्हणतील "अन् आमचेही" ;).

२. तसेही मला वाटते की जुन्या चर्चा होऊन बरेच महिने झाले आहेत. त्यानंतर बरेच नवीन सदस्य झाले असतील. त्यांची याविषयीची मतेही या चर्चेमुळे जाणता येतील.

३. ज्यांना मनोगतावरची जागा अशा चर्चांनी खर्च करत आहे असे (उगाचच फालतू काळजी) वाटत आहे, तर त्यांना माझे असे म्हणणे आहे की ही प्रशासकांची काळजी आहे. तुमचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही.

४. ज्यांना ही चर्चा 'निरर्थक' वाटते, तर मग आवर्जून सर्व प्रतिसाद वाचून आणि वरून त्याला त्रोटक प्रतिसाद देऊन उलट स्वतःची शक्ती का वाया घालवतात? नाही पसंत पडली तर चर्चेत भाग कशाला घ्यायचा ? तुम्हाला कुठे मारून मुटकून चर्चा वाचण्यास आणि प्रतिसाद लिहिण्यास भाग पाडत आहे.

५. मी स्वतः 'मांसाहारी' आहे आणि बरेचशे मला प्रतिसाद देणारे पण असतील. पण याचा अर्थ असा नाही की मी कायमचा 'मांसाहारी' असेन. तुम्हा ज्येष्ठांची मते आणि अनुभव वाचून मी कदाचित मतपरिवर्तनही करू शकतो.

खरे तर मी या चर्चेआधी खरंच माझ्या मनात 'मांसाहार' कायमचा सोडावा का ? हा प्रश्न आला होता. पण त्या आधी लोकांची मते जाणून घ्यावी अशी प्रामाणिक इच्छा होती. मनोगतच्या रूपाने मला ही आयतीच सोय उपलब्ध करून दिली आहे, मग यात चुकले काय?

ज्यांनी मला प्रामाणिक प्रतिसाद दिले आहेत त्यांचे मी आभार मानतो.

माझा निष्कर्ष:  माझी 'मांसाहार' विषयीची (आधीची) मते आणि इतर मनोगतींच्या मतांचा अभ्यास करून मी माझा 'मांसाहार' सध्या तरी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याचबरोबर 'प्रियाली'नी एका प्रतिसाद सांगितल्याप्रमाणे माझ्या 'मांसाहारा'ने कोणाच्या भावना दुखवणार नाही ना ? याचीही काळजी घेईन. जसे 'जर घरातल्यांना गणपतीच्या दिवसांत मांसाहार केलेले आवडत नसेल तर मी तो टाळीन'.

आणखीन पुढे म्हणजे, मला जेव्हा 'मांसाहार' आणि 'शाकाहार' असे दोन पर्याय असतील तर मी शक्यतो 'शाकाहार' पसंत करेन. उदा. जसे तुम्ही एखाद्याकडे भेटायला गेला आहात आणि त्यांनी जेवायचा जोरदार आग्रह धरला आणि त्यात त्यांनी 'मांसाहार' जेवण आधीच बनवले असेल तर हट्ट धरून त्यांना 'शाकाहारी' स्वयंपाक करायला लावणार नाही. स्वतःच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांचा जीव घेणे हा मला तरी माझा स्वार्थ वाटतो. उद्या तुम्ही माणसेही मारायला लागाल - काही 'मनुष्य-भक्षक' आदिवासी जमाती  करतात तसे किंवा स्वतःच्या इतर स्वार्थासाठी. मग तुमच्यात आणि प्राण्यांच्यात फरक काय राहिला?  'मांसाहारी' प्राणी तरी स्वतः चे पोट भरण्यासाठी खातात, चवीत बदल म्हणून नाही.

असो ज्यांना माझे म्हणणे पटेल त्यांना पटेल, पण माझे मत तर आता असेच राहील.

पुन्हा एकदा धन्यवाद.

- मोरू