स्वत:च्या भाषेत लिहावे, बोलावे, असे कुणाला वाटत नाही ? महाजालाच्या या युगात स्वत:चे लिखाण प्रकाशित करणे तर खूपच सोपे झाले आहे. तुम्ही हे वाचताहात यावरूनच याचा प्रत्यय येईल. सध्या तर मी माझ्या महाजाल न्याहाळण्यापैकी (web-browsing) ७०% वेळ हा मराठी वाचण्यात घालवतो. मनोगत, मायबोली, मराठीब्लॉग्ज.नेट अशा नेहमीच्या वाचनातील स्थळे असोत, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत अशी वृत्तपत्रे किंवा सांगलीच्या डॉ. रानडे यांच्या ज्ञानदीप फाउंडेशन ची संकेतस्थळे असोत (त्यांचे vidnyan.net हे स्थळ अवश्य बघा). “माझी मायबोली आज माहेरा आली”, अशी भावना माझ्या मनात तेव्हा असते. मराठीला महाजालावर तिचे योग्य ते स्थान प्राप्त करून देण्यात या स्थळांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
माझा महाजालावरचा १७ वर्षांचा वावर आहे. इ.स. २००० च्या सुमारास काही स्थळांनी मराठी वापरायला सुरुवात केली. तेव्हाच्या महाजाल तंत्रज्ञानात आणि आजच्या तंत्रज्ञानात जमीन अस्मानचा फरक आहे. तेव्हा त्यांना अक्षरचित्रावली (font), अक्षरपद्धती (encoding) ठरवण्यापासून ते स्थळाची मांडणी (layout) ठरवण्यापर्यंत सगळे काही करावे लागले. त्याकाळी अस्तित्वात असलेली परंतु फारशी प्रसिद्ध नसलेली युनिकोड ही अक्षरपद्धती आता वर्चस्व गाजवीत आहे. मुख्यत: त्यातली UTF-8 ही अक्षरपद्धती तर सर्वमान्य झाली आहे. (जाव्हा ही लोकप्रिय आज्ञाभाषा - programming language - जरी UTF-16 ही अक्षरपद्धती वापरत असली तरी UTF-8 मध्ये लिहिलेले कसे वाचावे हे त्यात अंतर्भूत आहे.) मुख्य म्हणजे ज्या जुन्या आज्ञावलींना युनिकोडचा गंधही नव्हता त्यांना देखील UTF-8 चे ASCII संस्करण वाचता येते. (कारण या दोन अक्षरपद्धतीतली पहिली १२७ अक्षरे सारखी आहेत, आणि जुन्या आज्ञावली या १२७ अक्षरांचाच वापर करीत होत्या.) युनिकोडमुळे सर्व भाषांतील सर्व अक्षरांना स्वत:ची एक संख्या मिळाली. युनिकोड अक्षर पद्धती समजणाऱ्या आज्ञावलींमध्ये (त्यात न्याहाळक - browsers - ही येतात) इंग्रजी आणि मराठी अक्षरे - आणि अशाच अनेक लिपी - सहजत: एकत्र बघता येतात. केवळ मराठीच नाही, तर भारतातील आणि जगातील सगळ्या लिपी त्यात अंतर्भूत आहेत. संगणकाला तुम्ही कुठल्या लिपीत लिहिताय याची वेगळी काळजी घ्यावी लागत नाही. त्याला कुंजीफलकाकडून (keyboard) एक संख्या मिळते आणि ते त्याच्या स्मृतीत साठवतो, आणि चुंबकीय तबकडीवर (hard-disk) मुद्रित करतो.
परंतु कुंजीफलकावर ५०-६० कळींमधून जगातल्या सर्व लिपींमधल्या खुणा कशा कळवणार संगणकाला? प्रत्येक खुणेला वेगळी कळ दाबावी लागली तर ६५५३६ कुंजींचा फलक असावा लागेल प्रत्येक संगणकाला. ते तर शक्य नाही. म्हणून संगणक आज्ञायकांनी ( computer programmers), अशी युक्ती शोधून काढली की नेहमीच्या कुंजीफलकातील ५०-६० कळाच कुठल्याही लिपीतील सगळी चिन्हे संगणकाला सांगू शकतील. म्हणजे मराठी लिहिताना (खरं तर देवनागरी लिपी लिहिताना) तुम्ही K ही कळ दाबली तर संगणकावरील सध्याच्या वापरिकेला (Application) कळावे की ह्या व्यक्तीला देवनागरी ‘ख’ लिहायचा आहे. ही युक्ती आज्ञावलीच्या स्वरूपात कुंजीफलक आणि वापरिकेच्या मध्ये बसते आणि कळांचे अनुवाद वापरिकेला सांगते युनिकोडमध्ये. याला म्हणतात टंकन विधिका संपादक (Input method editor). हा टविस (संक्षिप्त रूप) एकदा तुमच्या संगणकात स्थापित केला, की तुम्हाला त्या लिपीत लिहिता येते. देवनागरी, गुजराती, कन्नड, तामिळ, मलयालम अशा भारतीय लिपींसाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज वर वराह डायरेक्ट (baraha direct) असा टविस उपल्बध आहे. तो चकटफू आणि वापरायला सोपा देखील आहे. माझ्या घरच्या आणि कार्यालयातल्या विंडोज संगणकांवर मी तो बऱ्याच दिवसांपासून वापरतो आहे. आणि मी त्यावर फारच खूष आहे. तो मुक्त स्त्रोत करून इतर लोकांना नेहमीच उपलब्ध करून द्यावा या विचाराचा मी आहे. खरं तर मायक्रोसॉफ्टला जर भारतात त्यांचा जम बसवायचा असेल तर त्यांनीच तो टविस त्यांच्या विंडोजमध्ये अंतर्भूत करावा.
तशी विंडोजची मला इतर अनेक कारणांसाठी घृणा वाटते. त्यामुळे मी मुख्यत: अॅपलचा मॅक (किंवा लिनक्स) वापरतो. त्यात तर त्यांचा स्वत:चा टविस अंतर्भूत आहे. आणि देवनागरी अक्षरचित्रे देखील त्यांनी मोनोटाईप ह्या संस्थेची “devnagari MT” ही वापरली आहे. त्या अक्षरचित्रावलीत सर्वात जास्त जोडाक्षरचित्रे (glyphs) आहेत. अॅपलचा टविस वापरायला वराह पेक्षा जास्त सोपा आहे. त्यामुळे मला देवनागरी लिहिणे जास्त सोपे जाते. पण माझा अनुभव सांगण्यात लेखाच्या मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होते आहे, म्हणून मी ते आवरते घेतो.
देवनागरीसाठी सोपा टविस नसल्यामुळे बऱ्याच संकेतस्थळांनी स्वत:च कृती करण्याचे ठरवले. माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीने याची सुरुवात केली. युनिकोडच्या लोकप्रियतेच्या आधी हे संकेतस्थळ जन्माला आले, त्यामुळे त्यांना स्वत:चे प्रमाण (standard) ठरवता आले. परंतु त्याचा तोटा असा झाला की त्यांच्याकडे त्यांच्या अक्षरपद्धतीत लिहिलेले चिकार लेख जमा झाले जे कुठल्याही प्रमाणिकृत (standardized) न्याहाळकात (browser) नीट दिसत नाहीत. त्यामुळे मायबोलीवरच्या बऱ्याच लेखकांनी मनोगतला संक्रमण केले. मनोगतकारांनी एक चांगले केले की सुरुवातीपासून UTF-8 ची कास धरली. त्यामुळे गूगल, किंवा याहू या शोधयंत्रात मनोगत असे लिहिले तर त्यांचे स्थळ पहिल्या पानावरच्या शोधनिकालांत दिसते. मायबोलीला तो फायदा मिळत नाही. परंतु मनोगतकारांनी जावास्क्रिप्ट वापरून स्वत:ची टविस विकसित केली. त्यात आणि वराह मध्ये क्षुद्र का होईना, पण फरक आहेत, आणि त्यामुळे मला मनोगत वर लिखाण करणे थोडे कठीण जाते. देवनागरीत लिखाण करणे सोपे जावे ह्या काही संकेतस्थळांच्या भावनेतून त्यांनी स्वत:चे टविस विकसित केले, पण त्यांच्या कुंजीफलकांचे अनुवाद वेगवेगळे केले. त्यामुळे एकात ‘T’ लिहिला की ‘त’ येतो, आणि दुसऱ्यात ‘ट’. त्यामुळे जितकी मराठी संकेतस्थळे बघावीत तितके कुंजनुवाद (key-mappings). ही माझी या सगळ्या स्थळांविषयी तक्रार आहे. मी मुळात २४-तास जालयुगातच असल्याने मी काही तरी करून या स्थळांत माझे योगदान देऊ शकतो. पण संगणक-निरक्षरांचे (computer illiterate) काय? एक संगणक, एक टविस अशी सोय या स्थलांनी करायला हवी. (खरं तर एक कार्यकारी आज्ञावली - operating system - एक टविस अशी सोय हवी.) ही माझी मराठी संकेत स्थळांविषयी तक्रार आहे.
तुम्हाला काय वाटते ?
(ता. क. या लेखात वापरलेले सर्व मराठी प्रतिशब्द शब्दभांडारात उपलब्ध आहेत. योगदान द्या.)