नमस्कार मनोगतींनो.
इच्छा नसतानाही हे लिहावे लागते आहे.
श्री. वैद्य यांचे बाबतीत नाइलाजाने असे म्हणावे लागते आहे की त्यांना लेखातील विषयापेक्षा त्याला फाटे फोडणे व सनसनाटी विधाने करून प्रसिद्धी मिळविणे यात अधिक रस आहे.
एका लेखात (माझा नव्हता तो लेख) या महाशयांनी अंदमान व स्वा. सावरकर यांचा अनुल्लेख केला, अर्थातच प्रशासकांनी तो काढून टाकला. हुतात्मा राजगुरू यांच्या लेखात संपूर्ण जीवनचरित्र सोडून त्यांना राजगुरूंनी एकाच्या श्रीमुखात भडकावाली हेच त्यांच्या लक्षात राहिले. त्याचा धिक्कार करून हे महाशय थांबले नाहीत तर त्यांनी राजगुरूंना संभाजी ब्रिगेडच्या पंगतीत नेऊन बसवले. अर्थात सुज्ञ मनोगतींनी या खोडसाळ प्रतिसादाकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्यांचा हेतू सफळ झाला नाही.
आता प्राणांतिक उपोषण करणाऱ्या महान क्रांतिकारकांना हे महाशय आत्महत्या करणाऱ्यांच्या रांगेत बसवून वर त्यात फरक काय असे विचारत आहेत. आता इतक्या सुशिक्षित व हुशार व्यक्तीला तो समजत नसेल असे नक्कीच नाही पण काहीतरी खोडसाळपणा करून वाचकांचे लक्ष मूळ लेखावरून विचलित करायचे हाच हेतू. जर या क्रांतिकारकांवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करायचा तर ज्या कृत्यासाठी गांधींचा 'उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया' असे गौरवाने गायले गेले त्यासाठी तर या महाशयांच्या न्यायाने चोरीचा खटला भरायचा की काय?
नको तिथे आपली विद्वत्ता दाखवून हे स्वतः:चे हसे करून घेत आहेत.
अवघ्या सहा शिलेदारांना घेऊन बहलोलखानाच्या तीस हजार फौजेवर सूडाने पेटून व अपमानाचा बदला घेण्यासाठी मरणार हे माहीत असूनही धावून गेलेल्या व धारातीर्थी पाडलेल्या प्रतापराव गुजरावर 'वेडात मराठे वीर दौडले सात' असे लिहिणारे कुसुमाग्रज मूर्ख की काय याचे उत्तर या विद्वानांनी जरूर द्यावे.
आता उपोषण व त्याच्या संबंधी उल्लेखांविषयी. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या गांधीवाद्यांनी उपोषणाचे गोडवे गायले त्यापैकी कुणीही स्वतः आमरण उपोषणाने हुतात्मा झाला नाही वा त्यांची स्वराज्याची मागणीही पूर्ण झाली नाही. खेद याचा वाटतो की स्वतः गांधींनीही या उपोषणाचा खुल्या दिलाने गौरव केला नाही. असे का? जो मार्ग त्यांनी अवलंबीला तर गौरवास्पद व न्याय्य, तोच इतर देशभक्तांनीही अवलंबिला तर त्याचे कौतुक व अभिनंदन करायला इतक्या मोठ्या माणसाला कमीपणा का वाटावा?
नंतर; विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात तर उपोषण हा सवंग प्रसिद्धीचा मार्ग झाला. लक्ष्मण यांनी देखिल यावर व्यंगचित्रे केली आहेत. गाजावाजा करून समारंभपूर्वक उपोषण जाहीर करायचे व वर्तमानपत्रात छबी झळकली की मोसंब्याचा रस घेऊन ते सोडायचे हा एक खेळ झाला.
असो. जाता जाता मला वैद्य महाशयांचे आभार हे मानलेच पाहिजेत! त्यांनी भले काहीही कारणासाठी अप्रस्तुत वाद काढले असतील, मात्र त्यामुळे अनेकांनी काळजिपूर्वक वाचन केले असेल व त्या निमित्ताने हुतात्म्यांना वंदनही केले असेल. अधिक काय पाहीजे?