मी महाविद्यालयात असताना मराठी वाड्मय मंडळासाठी कार्यक्रम ठरवायला म्हणून डॉ. आनंद नाडकर्णींकडे गेलो. आमचा (विद्यार्थ्यांचा) विचार त्यांचा प्रश्नोत्तररूपी कार्यक्रम हा नशा आणि ड्रग्जवर वगैरे करूया (त्यात त्यांचे चांगले नाव होते, त्यांनी पुस्तके आणि चित्रिकरण वगैरे केले होते, म्हणून). पण ते म्हणाले महाविद्यालयात बोलायचे असेल तर मी "कामसंवाद" अर्थात लैंगीक शिक्षणावरून बोलणार.
मी परत येऊन जेंव्हा वरील वर्गातील विद्यार्थ्यांशी बोललो तेंव्हा ते खूशच झाले! मग आम्ही मंडळासाठी जबाबदार असणाऱ्या प्राचार्यांशी बोलायला गेलो ते आढेवेढे घेयला लागले! शेवटी तयार झाले. मग नाडकर्णींशी ओळख कोणी करून देयची यावर चर्चा झाली. जी मुले (अती) उत्साही होती ती लाजायला लागली. ऐन वेळेस मी कार्यक्रम ठरवला (कमिटीवर नसून) म्हणून मला सांगीतले. मी माझ्या मित्र आणि मैत्रिणी अशी दोन्हीकडून कॅफ़ेटेरीयात मदत घेऊन माझे भाषण तयार केले. (त्यांची ओळख, विषयाचे महत्व इत्यादी).
तो कार्यक्रम पहायला न भूतो न भविष्यती अशी मराठी आणि अमराठीसर्वांनी हॉल भरून गर्दी केली होती, की उभे राहायलाही जागा नव्हती! कार्यक्रम खूपच छान झाला. त्यांनी काही स्थलकालाचे भान/मर्यादा ठेवून चावट (अश्लील नाही) विनोद सांगून सुरवात केली. नंतर चांगले विषयाला अनुसरून भाषण केले. शेवटी मुलांनी आणि मुलींनीही प्रश्नही चांगले आणि मोकळेपणाने विचारले. कुठेही असभ्यपणा झाला नाही. प्राचार्य वर्गाला वाटणारी भिती या कार्यक्रमाच्या बाबतीत साफ़ खोटी ठरली.