संस्कार या शब्दाचा अर्थ चांगले आणि वाईट यात भेद करायला शिकणे असा असला पाहिजे, असे मला वाटते. आपापली जबाबदारी ओळखून चोख कर्तव्यपालन करणे, इतरांना उपद्रव होईल असे वर्तन न करणे, आपण समाजात रहातो याची काहीतरी किंमत आपण समाजाला दिली पाहिजे याची जाण ठेवणे... अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. सुसंस्कार आणि धार्मिकता याची सांगड नेहमी बसेलच असे नाही. आता उदाहरणार्थ मुलाला परदेशात असताना रामरक्षा शिकवली, पण त्याला सार्वजनिक जागी कचरा करू नये हे शिकवले नाही, तर तो मुलगा सुसंस्कृत आहे, असे म्हणायचे का?