गायनामधे माझ्या अंदाजाप्रमाणे संख्या समान असावी. शास्त्रीय व सुगम दोन्ही. तज्ञ लोक प्रकाश टाकतीलच. नृत्य ही बऱ्याच अंशी अजूनही स्त्रियांची मक्तेदारी आहे पण तरी आदरणीय बिरजू महाराज (कानाला हात खरंच..), उदय शंकर, गोपीकृष्ण, केलूचरण महापात्रा, गुरू पार्वतीकुमार अशी काही महत्त्वाची नावं शास्त्रीय नृत्याच्या इतिहासातली महत्त्वाची पानं आहेत.  नवनृत्याच्या (काँटेंपररी किंवा मॉडर्न डान्स) क्षेत्रात मात्र शास्त्रीय नृत्यापेक्षा पुरूष जास्त असावेत असा अंदाज आहे. आस्तद देबू हे एक खूप मोठे नाव. असो.. स्त्रियांची नावं बघतोय नाही का आपण..

चित्रकलेच्या प्रांतात मात्र तेवढे मोठे नाव दिसत नाही. रोज बाँबे टाईम्स वाचला तर पेज थ्री वर अनेक चित्रकार स्त्रियांचे उल्लेख दिसतात. तसंही आपण चित्रकलेच्या क्षेत्राबद्दल एकुणातच इतके अनभिज्ञ असतो की एखादा वादंग किंवा अतिच नेत्रदीपक काहीतरी घडल्याशिवाय त्या राज्यात काय चाललंय हे आपल्याला कळत पण नाही. मला तरी जगभरात प्रसिद्ध असलेली एकच पाश्चात्य बाई माहितीये जिचं एकटीचं सँटा फे, न्यू मेक्सिको, युएसए इथे संग्रहालय आहे. ती म्हणजे जॉर्जिया ओ कीफ.

लेखनाच्या क्षेत्रात स्त्री-पुरूष संख्या समानच्या आसपास असावी पण कसदार आणि खरं लिहिणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच पण नाही तसंही नाही.. कसदार आणि खरं लिहिणारे कुणीही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.

६४ वी कला.. जाहिरातकला... यातली परिस्थिती माहित नाही पण आजपर्यंत आर्टवर्क - ग्राफिक्स करून देणाऱ्यापासून पब्लिसिटी बघण्यापर्यंत सगळे पुरूषच जास्त भेटले आणि त्याच वेळेला जेजे किंवा इतर कला महाविद्यालयांमधे कमर्शिअल आर्ट साठी मुली आणि मुलांची संख्या मात्र बरीचशी सारखीच असते.. (हे निरीक्षण चूक असल्यास योग्य ती परिस्थिती कृपया सांगावी.). या एवढ्या मुली जातात कुठे?

अजून एक कलेचं किंवा कलाकुसरीचं क्षेत्र आपण दुर्लक्षित करतो ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट.. सिरॅमिक पासून, डायिंग पासून, कचऱ्यातून कला पर्यंत.. अर्थातच यात कलाकृती कमी आणि क्राफ्टवर्क जास्त असते. हे सगळे प्रकरण रूखवताचे म्हणून लग्नाळू मुलींनी किंवा घरात बसलेल्या बाईनी रिकामपणी करायचे उद्योग म्हणून पाहिले जाते. या गोष्टींकडे बघायचाही दृष्टीकोन बदलायला हवा..