एकदा कार्यालयातल्या एका मित्राला मी शनिवारी घरी बोलावले होते. बराच उशीर झाला तरी पठ्ठ्या काही आला नाही. त्यामुळे फोन करावा म्हंटलं तर त्याचा मोबाईल नंबर नव्हता. कार्यालयातल्या दुसऱ्या एका मित्राला फोन करून नंबर विचारून घेतला.

मी तो नंबर फिरवून पाहिला पण एंगेज टोन येत होता. मी बराच वेळ, जवळ जवळ अर्धा तास सारखा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो. दुसरा काही उद्योगही नव्हता मला. पण शेवटी कंटाळलो. वाटलं असेल महत्त्वाचा फोन एखादा... एक संदेश पाठवावा. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल.

असं म्हणून मी एक संदेश पाठवला..... आणि दुसऱ्याच क्षणी तो संदेश मला परत आला! मला काही उलगडेना... आणि मग डोक्यात ट्यूब पेटली... मी इतके वेळ जो नंबर लावत होतो तो खुद्द माझाच होता!! ज्याला नंबर विचारला तोही घाईत असल्याने माझाच नंबर मला देऊन मोकळा झाला होता. आणि मीही अर्धा तास माझाच नंबर लावत होतो.... गेली चार वर्षे जो नंबर मला पाठ आहे त्याबद्दल असं कसं व्हावं मलाही कळालं नाही.

म्हंटलं तर वेंधळेपणा दोघांचाही होता. पण माझा जरा जास्तच. big grin

कार्यालयात यावरून नंतर बरेच दिवस माझी थट्टा चालू होती. blushing