मला वाटत इथे मूळ प्रश्न संस्कार म्हणजे काय हा आहे? पण इथे बरीच चिखलफेक सुरू दिसते आहे.
मला संस्कार म्हणजे विचारांची बैठक वाटते. आपण एखादी गोष्ट करतो आहे ती का करतो आहे? त्याचे परिणाम चांगले की वाईट? ते चांगले की वाईट माझ्यासाठी की इतरांसाठी सुद्धा आणि बरेच काही. थोडक्यात सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून विचार करायची सवय.
आता ते कसे करायचे? हा व्यक्ती सापेक्ष प्रश्न आहे. २५ वर्षापूर्वी त्याचे परिमाण वेगळे होते. जसे जसे शास्त्रीय बैठक वाढत जाते तसे याचे स्वरूप बदलत जाते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
आता काही उदाहरणे पाहू.
रामरक्षा, मनाचे श्लोक, गीतेचे अध्याय ... हे का शिकणे आणि पाठांतर का? या सर्व काव्यांमध्ये अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या आहेत. आता त्या सांगताना ते कथा रूपाने समजावून सांगणे आणि त्या मागचे विचार सांगणे हे पालकांचे कर्तव्य आहे. तसेच एकदा शिकवणे म्हणजेच दोनदा शिकणे हे जर लक्षात घेतले तर शिकवताना पालकांचे आत्मपरीक्षण सुद्धा होते. लहानपणा पासून पाठांतराची सवय शालेय अभ्यासात नक्कीच फायदेशीर आहे.
हे शिकवत असताना अंधश्रद्धा चुकीची आहे ही शिकवण सुद्धा गरजेची आहे. आता असा विचार करू की एका मुलाला हे सगळे पाठ आहे. पण त्याचा अर्थ अजिबात माहीत नाही. अन ते म्हणून होताच काही अपशब्द लाडाने वापरून तो मित्रांना हाक मारून खेळायला जातो? हे सुसंस्कार आहेत?
लहान मुले मोठ्यांचे आणि भोवतालच्या परिस्थितीचे अनुकरण करून शिकतात. अशा वेळी पालकांच्या तोंडूनच अपशब्द ऐकून बोलले असता ते वाईट आहे हे न सांगता त्याचे फाजील कौतुक करणे अन ते ही अनेकदा जाहीरपणे. याला काय म्हणायचे?
खोटे बोलू नये हे शिकवायचे आणि हेच नको असलेला पाहुणा आला की मी घरात नाही हे त्याच मुलाला सांगायला सांगणे हे काय म्हणायचे?
असे अनेक मुद्दे आहेत. चर्चा वाढत जाईल तसे लिहूच.