लहानपणी श्लोक पाठ न केल्याने काही बिघडत नाही? भाषा शुद्ध (जातीय अर्थाने नाही तर वाचा या अर्थाने) आणि पाठांतराची सवय हे नसलं तरी काही बिघडत नाही असे व्यवसाय फार थोडे आहेत.

माफ करा, पण रामरक्षा मलाही कोणी लहानपणी शिकवली नाही, आणि आजतागायत मला ती येतही नाही, पण माझ्या उच्चारातल्या / लेखनातल्या चुका काढून दाखवाच, असं माझं तुम्हाला (किंवा इतर कोणालाही) खुलं आव्हान आहे!

(नाही म्हणायला आमच्या तीर्थरूपांनी लहानपणी आम्हाला चारदोन - मोजून चारदोनच! - संस्कृत सुभाषितं शिकवण्याचा - पाठ करून घेण्याचा नव्हे, तर अर्थ समजावून शिकवण्याचा! - प्रयत्न केला [जी आम्ही नंतर ताबडतोब विसरूनही गेलो!], नाही असं नाही, पण:

१. ती शिकवण्यामागे "काय आपल्या मुलावर मोठे 'आपल्या धर्माचे' संस्कार करतोय" असा कोणताही आव नव्हता [तसेही ते धार्मिक श्लोक नव्हते, तर सुभाषितं होती], तर "मला आवडणाऱ्या एका चांगल्या गोष्टीची मुलाला ओळख करून देऊन त्यात आवड निर्माण झाली तर बघावी" ही भूमिका होती.
२. त्या सुभाषितांच्या पाठांतरापेक्षा [खरं तर -ऐवजी] त्यांचा अर्थ समजावण्यावर भर होता. किंबहुना अर्थ न समजून घेता केवळ पाठांतराला - खरं तर पाठांतर/घोकंपट्टी या एकूण संकल्पनेलाच - दुराग्रह म्हणता येईल इतका प्रखर विरोध होता.
३. तशीही त्यांनी ती सुभाषितं लहानपणी एक गंमत म्हणून शिकवली नसती, तरीसुद्धा काही फरक पडला नसता. त्यांचं मराठी [आणि इंग्रजीसुद्धा!] भाषेवरचं प्रभुत्व इतकं होतं, की त्यांच्याबरोबरच्या संवादांचेच संस्कार आमचे उच्चार स्वच्छ आणि भाषा काटेकोर करण्यासाठी पुरेसे होते. [उच्चारातल्या किंवा भाषेतल्या चुका तोंडावर - अगदी चारचौघांतसुद्धा! - काढून दाखवून आमची इज्जत काढत. त्याबद्दल त्या वेळी काहीही वाटलं, तरी आज त्याचं महत्त्व कळतं!]

त्यामुळे "भाषा 'शुद्ध' होण्यासाठी पाठांतर" हे एक थोतांड आहे, असं मी तरी मानतो.

आणि नाही म्हणायला उच्चार 'शुद्ध' होण्यासाठी पाठांतर करायचं म्हटलं, तरी मुळात शिकवणाऱ्याचे उच्चार 'शुद्ध' / एखाद्या शब्दाचा 'शुद्ध' उच्चार काय आहे याची शिकवणाऱ्याला किमान माहिती असायला पाहिजे ना? ही माहितीच जर नसेल [आणि असं बऱ्याचदा आढळतं - अगदी आपली शुद्ध भाषा / शुद्ध उच्चार यांबद्दल अभिमान बाळगणाऱ्या वर्गांतसुद्धा!], तर असं पारंपारिकरीत्या 'बाबा वाक्यं प्रमाणम्' पद्धतीनं चालत आलेलं चुकीच्या उच्चारांसहितचं पाठांतर 'शुद्ध' भाषा / उच्चार जोपासण्यासाठी काय कामाचं?

तेव्हा 'शुद्ध' उच्चारांसाठी पाठांतराच्या महत्त्वाच्या कसल्या बाता मारताय?

नाही म्हणजे, कोणी मुलांकडून पाठांतर करवून घेऊच नये, असं मुळीच म्हणत नाही मी - शेवटी हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. पण त्याला जे अवाजवी महत्त्व दिलं जातं आणि त्यातून हे जे काही मोठमोठे तथाकथित फायदे मिरवले जातात - थोडक्यात स्तोम माजवलं जातं - त्याला विरोध आहे. मुलांकडून काहीही पाठ करवून घेऊ नये की रामरक्षा पाठ करवून घ्यावी की 'लहान माझी बाहुली' किंवा 'बा बा ब्लॅक शीप' पाठ करवून घ्यावं की लहान मुलं ज्यातून काही सहज शिकतील अशा कविता पाठ करवून घ्याव्या की हे सगळंच पाठ करवून घ्यावं, हे ज्यानंत्यानं ठरवावं - उगाच आम्ही मोठे किंवा तुम्ही चूक हे ठरवू नये.

वर केलेल्या संपूर्ण विवेचनात उच्चार आणि भाषा यांचं विशेषण म्हणून वापरलेला 'शुद्ध' हा शब्द अवतरणांत टाकला आहे, त्या अवतरणांचा अर्थ खुशाल 'तथाकथित' अर्थात 'सो-कॉल्ड' असा घ्यावा, कारण तोच अर्थ अभिप्रेत आहे.)

आणि दहावी, बारावी हे टप्पे तर बुद्धीपेक्षा पाठांतरावरच पार करावे लागतात.

पुन्हा, आमचे तीर्थरूप नेहमी - अगदी ऐन परीक्षेच्या वेळीसुद्धा! - "पाठांतर करू नका! समजून घ्या!" अशी बोंब मारत* आले. तेव्हा जरी ते भयंकर चुकीचं वाटलं, तरी आज पटतं.
आपली शिक्षणपद्धती चुकीच्या मूल्यांवर आधारलेली आहे हे पाठांतर/घोकंपट्टीचं समर्थन होऊ शकत नाही.

- टग्या.

*मला वाटतं इतर काही मारण्याच्या उल्लेखापेक्षा बोंब मारण्याचा उल्लेख हा कमी आक्षेपार्ह (आणि कदाचित म्हणूनच त्यातल्या त्यात अधिक 'सुसंस्कृत') ठरावा. अर्थात नाही ठरला, तरी त्यानं मला काही फरक पडत नाही म्हणा!