आईची उतारवयातील समस्या (भावनिक आधाराची) तरुण वयातील मुलीला समजणे जरा अशक्यच आहे. आई स्वतः तरुण असताना तिच्या आईच्या बाबतीत असा प्रसंग उद्भवला असता तरी कदाचित तिची प्रतिक्रिया अशीच असती. ह्याला कारण म्हातारपणातील मानसिक अवस्थेचे योग्य भान तरुण वयात येत नाही. मुलीने आज घेतलेल्या भूमिकेचे कदाचित ती स्वतः जेव्हा आईच्या आजच्या वयाला पोहोचेल तेंव्हा (तसाच प्रसंग समोर आला नाही तरीही..) तिची चूक तिला उमगेल. (पण तेंव्हा उशीर झाला असेल.)
आपल्या आईच्या जागी नवीन आई किंवा वडिलांच्या जागी नवीन वडील स्वीकारणे फार कठीण असते. त्यासाठी, मला वाटते समस्याग्रस्त आईने/वडिलांनी, मुलांना, 'येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आई किंवा वडील मानण्याची आवश्यकता नाही', तर माझी जोडीदार मानावे, असे पटवून दिले पाहिजे. मुलांनी सामाजिक प्रतिष्ठेचा बाऊ न करता त्या व्यक्तीला आईचा/वडिलांचा जोडीदार म्हणून स्वीकारावे. मुलांनी स्वीकारल्यावर समाजही त्या समस्येत ढवळाढवळ करीत नाही, असे दिसून आले आहे.
माझ्या माहितीत तर एका विवाहित मुलीनेच स्वतःच्या एकट्या आईचे मन परिवर्तन करून तिला नवीन लग्नासाठी तयार केले. स्वतः पुढाकार घेऊन, वधू-वरसूचक मंडळात जाऊन, आईसाठी जोडीदार निवडला. ते सर्वजण आजही आनंदात आहेत.
आर्थिकदृष्ट्या समर्थ आणि मुलांचे पुरेसे प्रेम लाभलेल्या व्यक्तींनी उतारवयातील विवाह टाळावेत असे, आज तरी मला वाटते. पण तरीसुद्धा, कोणास विवाह करावासा वाटला तर त्यात मला काही अयोग्य दिसत नाही.