चला आता संस्कृतीला पुरुषप्रधान करू, असे म्हणून ती तशी झालेली नाही.
पुरुषांतील असुरक्षितता, प्रजननक्षम स्त्रियांना आपल्या अंकित ठेवण्याची नैसर्गिक ऊर्मी यातून प्राचीन काळात टोळी युद्धे झाली असणार. (चिंपांझीमध्ये होतात तशीच!) अर्थातच जो बलवान तो जिंकला आणि त्याची प्रजा वाढली. त्यातून नर माद्यांहून शक्तिशाली झाले. पुढे मनुष्य पिल्लाच्या प्रदीर्घ बाळपणामुळे (व त्यातून मिळणाऱ्या मोठ्या मेंदूच्या फायद्यांमुळे) एकास एक जोडी जमवणारे 'फ़िटेस्ट' ठरले. ते निवडले गेले.
पुढे संस्कृत्या प्रगत होत गेल्या तसतसे समाजनियम वगैरे ठरू लागले. त्यातही बळी तो कान पिळी या न्यायाने ते पुरुषधार्जिणे बनवले गेले. 'आपण कोणीतरी विशेष आहो.' हे प्रत्येक माणसाला वाटत असते. पुरुषांच्या हाती सत्ता असल्याने त्यांनी ते 'जास्त विशेष' असे लिहून ठेवले, समाजाच्या मनावर ठसवले. पण पुढे पुरुषांच्या पुढाकारानेच स्त्रियांना समान दर्जा मिळण्याचे काम सुरू झाले!
'गुलामाला गुलामाची जाणीव' झाल्यावर आता पुन्हा पूर्वीसारखी पुरुषप्रधान संस्कृती आणणे शक्य नाही. तेव्हा ज्या मार्गाने चाललो आहोत त्याच समानतेच्या मार्गाने प्रगती साधावी. स्त्रियांच्या रूपाने मिळणारी क्रयशक्ती, बुद्धिमत्ता वापरून घ्यावी. यातच समाजाचे हित आहे असे मला वाटते.