तिन्ही बहिणींनी १० रु. ना ७ आंबे असा (समान) भाव लावला. गिऱ्हाईकांची एकच झुंबड उडाली व शक्य तेवढे सर्व आंबे विकले गेले.
म्हणजे
१ ल्या बहिणीचे १० पैकी ७ आंबे खपले व तिला १० रु. मिळाले नि ३ आंबे शिल्लक राहिले.
२ ऱ्या बहिणीचे ३० पैकी २८ आंबे खपले व तिला ४० रु. मिळाले नि २ आंबे शिल्लक राहिले.
३ ऱ्या बहिणीचे ५० पैकी ४९ आंबे खपले व तिला ७० रु. मिळाले नि १ आंबा शिल्लक राहिला.
हा वेळपावेतो लोकांना या चविष्ट आंब्यांची बातमी लागून त्यांची गर्दी लोटली होती. आता या परिस्थितीचा फायदा घेऊन तिन्ही बहिणींनी भाव वाढवला.
त्यांनी आता ३० रु. ना १ आंबा असा अतिशय चढा (पण पुन्हा समानच) भाव लावला.
यामुळे सगळे आंबे खपल्यावर
१ ल्या बहिणीला तिच्या ३ आंब्यांसाठी ९० रु. मिळाले. एकूण रु. १० + ९० = १००.
२ ऱ्या बहिणीला तिच्या २ आंब्यांसाठी ६० रु. मिळाले. एकूण रु. ४० + ६० = १००.
३ ऱ्या बहिणीला तिच्या १ आंब्यासाठी ३० रु. मिळाले. एकूण रु. ७० + ३० = १००.
अशा रीतीने त्यांनी समान भाव लावून समान पैसे मिळवले.

आता हे कोडे जुने म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर -
मी पहिल्यांदा हे कोडे मीर प्रकाशनाच्या या. पेरेलमन लिखित गणिताच्या पुस्तकात सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी वाचले होते. नंतर हल्ली - हल्ली शकुंतलादेवी यांनी त्यांच्या कोड्यांच्या पुस्तकात पुन्हा (श्रेयोल्लेख न करता) हे कोडे दिलेले वाचले, यालाही झाली १०-१५ वर्षे.
अशी सुंदर कोडी लोकांच्या नजरेला न पडता लुप्त होतात, तसे न व्हावे म्हणून मी मनोगतावर दिले. अजून २०-२५ वर्षांनी कोणाला तरी आठवले तर सार्थक झाले म्हणायचे.
असेच आणखी एक "बहुरंगी करमणूक" नावाचे एक खूप जुने मराठी पुस्तक होऊन गेले त्याविषयी एक वेगळा लेखच लिहावा लागेल.