मोरोपंत,
या विषयीची अनेक मते मनोगतावर अनेक चर्चा लेख चाळले तर मिळेलच. यात अनेक युक्तिवाद असे आहेत की हा इतिहास नाहीच मुळी. हि काव्ये आहेत आणि त्यात कल्पना विलासाला वाव आहे. आता हि काव्ये म्हणाली तर गीता व्यासांनी लिहिली आहे आणि कृष्ण हे पात्र पण त्यांचेच. मग ते एकमेव आहेत जे याचे उत्तर देऊ शकतील.
जर इतिहास म्हणून विचार केला तर,
कृष्ण हा अत्यंत हुशार राजकारणी होता. जिथे एखाद्या गोष्टीचा लाभ घ्यायची संधी होती ती घेणे त्याने अचूक साधले. हे त्याच्या बुद्धीचे यश आहे.
कर्ण हे व्यक्तिमत्त्व फारच वेगळे आहे. खूप मोहीत करणारे आहे. त्याच्या आयुष्यात अनेक अपवादात्मक प्रसंग आले. त्याचे त्याने त्याच्या बुद्धीला आणि तत्त्वाला पटणारे अर्थ लावून कृती केली. जिथे तो स्वतः चुकला तिथे त्याने आत्मपरीक्षण करून स्वतः प्रायश्चित्त भोगले. स्वतःच्या चुकांना त्याने कधी ही दुसऱ्यांना जबाबदार धरले नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वात हे सुद्धा दिसून येते की अनेकदा इतरांच्या चुकांची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. त्याला तर आपल्या आईच्या चुकांची शिक्षा भोगावी लागली. मला तो सदसद्विवेक बुद्धीला जागणारा महान योद्धा अन महान व्यक्ती वाटतो. इतरांची मते वेगळी असू शकतात.
मुळातच पांडवांना कूटनीतीने द्युतात हरवणे हे क्षत्रिय धर्माला धरून नव्हते. त्यात भर म्हणून द्रौपदीचे वस्त्र हरण. आता हे मोठे चर्चेचे मुद्दे आहेत. या वस्त्रहरणाच्या वेळची याच तीन महायोद्ध्यांनी आपली शस्त्रे बाजूला ठेवून राजाला वा राजपुत्राला श्रेष्ठ मानून काहीही केले नाही. त्यावेळी कर्णाचा जुना राग उफाळून आला अन त्याने काही ही भान न ठेवता जे केले त्या सगळ्याची ही फळे भोगली. मुळातच त्यावेळी होणारे कृत्य कृष्णाने थांबवले अन त्याच वेळी सर्व विनाशक युद्ध अटळ आहे हे या महायोद्ध्यांना माहीत होते. त्या वेळेस सुद्धा कर्णाला न सांगता दुर्योधनाने शेवटचा कपटी डाव खेळून पांडवांना वनवासात पाठवले.
ही सर्व अनीती युद्धाविना झाली. मग याच प्रकारे उत्तर कौरवांना मिळाले ते ही परिस्थितीमध्ये योग्य कच्च्या दुव्यांचा वापर करून.
मोरोपंत तुमचे मुद्दे बरोबर आहेत. फरक एवढाच आहे की त्यावेळी गांधीजी नव्हते. ते असते तर पांडवांना म्हणाले असते की लेकांनो तुम्ही द्यूत खेळताना अक्कल गहाण ठेवली होती आता युद्ध करून काय उपयोग? जो काही विनाश होईल त्याला तुम्ही जबाबदार राहाल. आणि मी जिवंत असे पर्यंत हिंसा होऊ देणार नाही. वाटल्यास तुम्ही सत्याग्रह करा.