मित्रांनो असीमला अपेक्षित आहेत त्या कदाचित या विषयावरील प्रतिक्रीया.. सचिन फीट नसतांनाही केवळ पाकिस्तान दौरा आहे म्हणून त्याला बळेबळे बोहल्यावर चढविले जात आहे. हे योग्य आहे का? तो जी काही आणखी ३-४ वर्षे खेळणार आहे तेही त्यामुळे शक्य होणार नाही. त्याची कारकीर्दच या दौर्यानंतर संपेल. त्याला संपविण्याचा गांगुलीचा तर हा डाव नाही ना? कालपरवापर्यंत सचिनला खेळण्यास विरोध करणार्या राईटने भूमिका का बदलली?? चर्चा करा... मूळ वृत्त असे-
आपल्या दुखापतींसंदर्भातील सर्व जर-तरचे प्रश्न निकालात काढताना, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असून आगामी भारत-पाकिस्तान मालिकेत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे म्हटले आहे.
हैद्राबाद येथील विशाखा स्टेडियमवर मंगळवारपासून सुरु होत असलेल्या पश्चिम व दक्षिण विभागादरम्यानच्या दुलीप करंडक स्पर्धेतील सामन्यासाठी येथे आलेल्या सचिनने सरावाला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की मी पूर्णपणे तंदुरुस्त असून आगामी भारत-पाकिस्तान मालिकेच्या दृष्टीने तयारी करीत आहे. या मालिकेत दोन्ही संघांवर दबाव असेल हे नक्की. एवढ्या उच्च पातळीवर कोणत्याही क्रीडा प्रकारात दबाव हा असणारच. मात्र पाकिस्तान संघाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी आणि भारतीय संघाची देशाबाहेरील कामगिरी यांची तुलना या मालिकेच्या दृष्टीकोनातून करणे योग्य होणार नाही, असे सचिनने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. प्रत्येक मालिका ही ताजी असते. आम्हाला आमच्या कुवती-एवढा खेळ करावाच लागेल, असे तो म्हणाला.
फलंदाजीच्या क्रमवारीत काही बदल अपेक्षित आहेत काय, असे विचारले असता थेट उत्तर देण्याचे सचिनने टाळले. हा निर्णय सौरव आणि इतरांनी घ्यायचा आहे. कुणी कुठे खेळायचे, याचा निर्णय कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने घ्यायचा असतो, असे सचिन म्हणाला.
कोपराच्या दुखापती संदर्भात विचारले असता, डॉक्टरांनी आणि फिजीओथेरपिस्टनी जे काही सांगितले होते ते सर्व मी केले आहे आणि मला स्वत:ला आता बरे वाटत असल्याने आगामी मोसमाकडे आपण मोठ्या आशेने पहात आहोत. सरावाच्या वेळी सचिनने आपल्या कोपराला बॅंडेज बांधले होते, त्या संदर्भात विचारले असता, सरावावेळी हे बॅंडेज बांधण्याची सूचना डॉक्टरांनी केली आहे. मी सध्या पूर्णपणे स्वस्थ आहे. मला कसल्याही वेदना होत नाहीत असे सचिनने सांगितले. मी विज्ञानातील तज्ञ नाही. फिजीओथेरपिस्टनी ज्या सूचना मला दिल्या आहेत त्या बरहुकूम मी मोठ्या सामन्यांची तयारी करीत आहे, असे सचिन म्हणाला.