अनंत साधल्यांचे एक महाभारतावर पुस्तक आहे. त्याचे नावच आहे, "हा जय नावाचा इतिहास आहे". या नावामधे सर्व काही येते. (खालील उत्तर या पुस्तकावरून लिहीलेले नाही)

महाभारत हे महाकाव्य आहे त्यामुळे त्यात लिहिलेल्याचा संदर्भ गोष्टी तशाच झाल्यात असे समजून वापरूया. त्या वर्तमानातील तर्कशास्त्राला धरून आहेत का हा विचार अनाठायी आहे.

आता महाभारत यद्धाच्या आधी कर्ण, द्रोण आणि भिष्माचार्यांनी काय केले ते पहा:

  1. कर्णाने परशूरामाकडून खोटे बोलून विद्या घेतली म्हणून 'वेळेवर त्या विद्येचा उपयोग होणार नाही', असा शाप मिळाला. नंतर एका गुराख्याचे पोट जिच्यावर अवलंबून होते अशा गायीला त्याने जाताजाता उगाच मारले म्हणून "तुला पण असेच मरण येईल" असा शाप मिळाला. द्रौपदी वस्त्रहरणाची कल्पना ही कर्णाचीच. नंतर" जो पर्यंत मी अर्जूनाला मारत नाही, तो पर्यंत कुठल्याही याचकाला विन्मूख पाठवणार नाही," अशी द्वेषाने भारलेली प्रतिज्ञा करून "दानशूर" झाला. कर्णाच्याबाबतीत सूतपूत्र होता म्हणून त्याला त्रास झाला अथवा मान मिळाला नाही ते अगदीच बरोबर नाही कारण "संजय उवाच" मधला संजय पण सूतपूत्रच होता. व्यास हे पराशरमुनींचे पुत्रहोते तसेच कोळीचेही होते. वगैरे...
  2. द्रोणांनी कायम "अर्थस्य पुरूषो: दास:" (व्याकरणाबद्दल माफी! - "पुरूष हा पैशाचा नोकर असतो") म्हणत कौरवांची बाजू घेतली. तरीपण जेंव्हा युधिष्ठीर युद्ध सुरू होण्याआधी नमस्कार करायला गेला, तेंव्हा त्यांनी वरील वाक्य म्हणत त्याला सांगीतले ('हिंट" दिली) की " ...मला युध्दात कोणी हरवू शकणार नाही, पण जर मला कोणा प्रिय व्यक्तिच्या मृत्यूची वार्ता समजली तर मी शस्त्रत्याग करून रणांगणात बसीन. दृष्ट्द्युम्नाचा जन्म हा द्रोणाच्या वधासाठी दृपदाने केलेल्या यज्ञातून झाला होता. त्यामुळे फसवून का होईना त्याने द्रोणाचार्यांना मारले.
  3. भिष्म हा शापीत आठवा वसू होता. कृष्णाशी ब्ऱ्याच अर्थाने साम्या, पण पक्ष मात्र चुकीच्या वृत्तींच्या लोकांचा.  त्याच्या प्रतिज्ञेमुळे कुरूराज्याच्या सतत बाजूस उभा राहीला. त्याने पण आशिर्वाद घेयला आलेल्या युधिष्ठीराला बाईच्या विरूद्ध मी लढणार नाही, नाहीतर मी अजिंक्य असेन असे सांगीतले होते. त्यांचा पण मृत्यू हा शिख़ंडीच्या हातून होणे हे विधिलिखित होते.

आता कृष्णाचे पाहू: - देव म्हणून बघा, माणूस म्हणून बघा किंवा महाकाव्यातील रंगवलेले पात्र म्हणून बघा काहीही फरक पडत नाही:

  1. नरकासूराने पळवलेल्या बायकांना समाज नाकारत असताना स्वतःचे पती म्हणून नाव दिले.
  2. अनेक राक्षसांना मारले.
  3. द्रौपदीवस्त्रहरणासाठी त्याने मदत केली ही कथा महाभारतात नाही. उलटे तो जेंव्हा वनवासात भेटायला गेला, तेंव्हा तीला म्हणाला की मला त्यावेळेस समजले असते तर तसाच युद्धासाठी आलो असतो.
  4. शांतीदूत म्हणून कौरवांकडे गेला खरा, पण जाताना द्रौपदीला शब्दही दिला की युद्ध होईल हे नक्की करीन!
  5. युद्धाच्या सुरवातीस गीता सांगत अर्जूनाला व्यावहारीक उपदेश केला.
  6. जयद्रथाला फसवून मारायला मदत केली आणि अर्जूनाला वाचवले.
  7. भिष्म, द्रोण आणि मग कर्ण यांना तसेच दुर्योधनाला कसे मारायचे हे त्यानेच सांगीतले. प्रत्येक वेळेस कसला तरी उपयोग करून: द्रोणाच्या बाबतीत 'नरोवा कुंजरोवाचा", भिष्माच्या बाबतीत "शिख़ंडीचा", कर्णाच्या बाबतीत "तेंव्हा कुठे होता राधासूता तुझा धर्म (वस्त्रहरणाच्यावेळेस) , असे म्हणत आणि दुर्योधनाच्या बाबतीत भिमाला त्याच्या "दुर्योधनाची मांडी फोडेन" या प्रतिज्ञेची आठवण करून देत.
  8. इतकी कूटनिती वापरणारा हा कृष्ण हा युध्दाच्या शेवटी व्यासांबरोबर अश्वत्थामा आणि अर्जून या दोघांनी सोडलेल्या ब्रम्हास्त्रांच्या मधे उभा राहीला आणि दोघांना आज्ञा दिली की आपापली अस्त्रे मागे घ्या. अर्जून घेउ शकला तर अश्वत्थाम्याला त्याचे ज्ञान नव्हते म्हणून त्याने अभिमन्यूची बायको उत्तरेच्या गर्भावर सोडले, अशा अपेक्षेने की त्यामूळे पांडव वंशाचा नाश होईल. तेंव्हा स्वत:ची पुण्याई आणि ब्रम्हचर्य (हो ब्रम्हचर्य) पणाला लावून त्याने त्या गर्भाला जिवंत केले आणि अश्वत्थाम्याला भिषण शाप दिला. (तो वाचला तर समजेल की किती कृद्ध होऊन कृष्ण बोलला आहे ते)
  9. नंतर धृतराष्ट्राचा भिमाला मिठी मारून मारण्याचा डाव उधळला आणि त्याला सुनावले.
  10. एव्हढे सर्व झाल्यावर युद्ध टळण्याची क्षमता असूनही टाळले नाही म्हणून "तुझ्या वंशाचा नाश तुझ्या समोर होईल" असा गांधारीकडून शाप घेतला..आणि तसे झालेली स्वतःच्या डोळ्यांनी पाहीले व मग एका अर्थाने विजनवासात मृत्यू पत्करला.

कृष्णाचे लहानपणापासून ते मरेपर्यंतचे जीवन पाहीले तर लक्षात येते की तो परस्परविरोधी नक्कीच वागला पण त्याचा स्वार्थ शून्य होता, तो अलीप्त होता. म्हणून तो उत्तम म्हणण्यासाठी लागणारी पुरूषची मर्यादा कधीच न पाळणारा आणि तरीही योगेश्वर संपूर्ण पूरूष म्हणून लोकप्रिय झाला.