नमस्कार स्वाती,
आपला लेख आवडला. मनोगतवर स्वागत आणि शुभेच्छा!
नवरात्रात अजून एक प्रकार निदान महाराष्ट्रात तरी असतो, तो म्हणजे: गोंधळ आणि अष्टमीच्या दिवशी अंगात येणे. मी काही अंधश्रद्धा ठेवत नाही तरी देखील अष्ट्मीच्या दिवशी किमान चार-पाच तास हातात घागर फुंकणाऱ्या बायकांची उर्जा बघून आश्चर्य नक्कीच वाटायची. आम्ही सर्वजण (मित्र/शेजारी पाजारी) एकत्र बघायला रात्री फिरायचो. त्यामुळे आमच्यात काही अंधश्रद्धा तयार झाली नाही की भिती तयार झाली नाही.
नवरात्राची दहा कडव्यांची आरती आणि तिची चाल मला खूप आवडते. घटस्थापना, कडधान्ये पेरणे, झेंडूच्या फुलांच्या माळा लावणे, नऊ दिवस चालणारा "नंदादीप" आणि संध्याकाळी आरती नंतर (रोज काही तरी वेगळा) प्रसाद वाटणे, यात कधी काम वाट्ले नाही तर ओझे वाटणे सोडूनच द्या...
ठाण्याला घंटाळी नवरात्रोत्सव खूप चांगला असायचा (अजूनही असेल अशी खात्री आहे). खूप मोठी मंड्ळी आवर्जून येयची - भिमसेनांचा पण छान कार्यक्रम घंटाळीच्या मोकळ्या मैदानावर बघितल्याचे आठवत आहे. वेळेवर सुरू होणाऱ्या कार्यक्रमात एकदा एका साहीत्यिकाला उशिर झाला म्हणून परत पाठवले होते! त्यांना पुढच्या वर्षी परत बोलावले तेंव्हा ते आले आणि पहील्यांदा बोलले की "आज सकाळपासून मी उशीर होऊ नये म्हणून ठाण्यात फिरत बसलोय!"
सरते शेवटी दसऱ्याच्या दिवशी विशेष करून शाळेतील शिक्षकांच्या घरी आपट्याची पाने - सोने लुटायला जायचो ते आठवते. शिक्षकही विद्यार्थी येणार त्यांना काही तरी गोड देण्याच्या तयारीत असायचे.
काळाच्या ओघात आणि प्रत्येक जुन्या पद्धतींना अनावश्यक कर्मकांड समजत आणि "मॉडर्न" कर्मकांडे आत्मसात करण्याच्या नादात आपण सहज आणि साध्या पद्धतीने तयार होणाऱी नाती आणि निर्भेळ आनंदाला मुकत चाललो आहोत.